मच्छिमारांना नुकसान भरपाई देण्याचे धोरण निश्‍चित

स्रोत: सहकार सुगंध          तारीख:23-Sep-2019मुंबई : महाराष्ट्राच्या समुद्रात किनार्‍यावरील ससेमिक सर्व्हे बाधित मच्छिमारांना भरपाई मिळावी याकरिता शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास व्हावा म्हणून सेंट्रल मरिन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट यांना नियुक्त करण्याचे ठरविण्यात आले आहे. पारंपरिक मच्छिेमारांच्या नुकसानीचे ते आलेखन करून देणार आहेत. त्यानुसार मच्छिमारांना भरपाई देण्याचे धोरण निश्‍चित केले जाईल, असे स्पष्ट आश्‍वासन ओएनजीसीद्वारे कोळी समाजाच्या शिष्टमंडळाला देण्यात आले.
 
मुंबई हाय ते दमणपर्यंत तेल संशोधनाकरिता ओएनजीसीद्वारे झालेल्या ससेमिक सर्व्हेच्या वेळी दोन ते अडीच महिने पारंपरिक मच्छिमारांना मासेमारीला मज्जाव करण्यात आला होता. त्या विरोधात मच्छिमारांची आंदोलने सतत सुरू होती. त्या मागणीसंदर्भात ओएनजीसी येथील कार्यालयात ओएनजीसीचे कार्यकारी संचालक विरेंद्र महेंद्रु आणि इतर अधिकार्‍यांबरोबर कोळी महासंघाच्या पदाधिकार्‍यांची बैठक पार पाडली. कोळी महासंघाचे अध्यक्ष आमदार रमेश पाटील, सरचिटणीस राजहंस टपके, कार्याध्यक्ष प्रकाश बोबडी, किरण कोळी, राजश्री भानजी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
 
येत्या 10 दिवसांच्या आत सीएमएफआरआय ही संस्था नियुक्त केली जाणार असून त्यांना शास्त्रशुद्ध अभ्यास करण्यासाटी 6 महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे. त्यांच्या अहवालावरून मासेमारी आणि त्यावर अवलंबुन असणार्‍या घटकांचे सर्वेक्षण करून भरपाई देण्याचे धोरण निश्‍चित केले जाईल, असे कार्यकारी संचालक श्री महेंद्रु यांनी शिष्टमंडळाला सांगितले. त्याचबरोबर ओएनजीसीमध्ये सेवा भरतीमध्ये मच्छिमारांच्या पाल्यांना प्राधान्याने संधी मिळावी म्हणून स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग देण्याचे मान्य करण्यात आले.
 
मच्छिमारांच्या शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी सीआरएस फंड वापरण्याची मागणी, सागरतटीय सुरक्षा, तेल विहिरींचे संरक्षण, मच्छिमार आणि ओएनजीसी यांच्या मध्ये सौहार्दाचे वातावरण निर्माण होण्यासाठी प्रशिक्षण शिबिरे घेणे, ससेमिक सर्व्हे करण्यापूर्वी मच्छिमार समाजाला विश्‍वासात घेण्याचे मान्य केले असून याच्या अंमलबजावणीकरिता लवकरच मत्स्यव्यवसाय खात्याबरोबर आणि मच्छिमार आणि अधिकारी ओएनजीसी अधिकारी यांची एक संयुक्त समिती गठन केली जाणार आहे. 
 
समुद्रातील तेल व विहिरी आणि तेल सर्व्हे यामुळे मच्छिमारांमध्ये कित्येक वर्षांपासून असंतोष पसरला होता. यावर योग्य तोडगा या बैठकीत झाला असून मच्छिमारांच्या हिताच्या योजना राबविण्यासाठी योजना आखण्याचे त्यांनी मान्य केले. या बैठकीमुळे मच्छिमारांना अधिक संधी उपलब्ध होतील, असा विश्‍वास कोळी महासंघाचे अध्यक्ष श्री. पाटील यांनी व्यक्त केला. बैठकीला कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेशदादा पाटील, सरचिटणीस राजहंस टपेक, कार्याध्यक्ष प्रकाश बोबडी, किरण कोळी, राजश्री भानजी, रामदास मेहेर व इतर पदाधिकार्‍यांनी सहभाग घेतला.