पुणे कमर्शिअल बँक सहकाराचा नावलौकिक वाढवेल आरबीआय संचालक सतीश मराठे यांचा विश्‍वास

स्रोत: सहकार सुगंध          तारीख:21-Sep-2019
 
 
 
सातारा : पुणे कमर्शिअल बँक या नव्या नावाबरोबरच ग्राहकसेवेचे उल्लेखनीय कार्य करणारी पूर्वाश्रमीची शिवनेरी बँक सहकार क्षेत्रात नावलौकिक पटकावेल, असा आशावाद रिझर्व्ह बँकेचे संचालक व ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ सतीश मराठे यांनी व्यक्त केला आहे.
 
बँकेचा नामविस्तार व संकेतस्थळाचे उद्घाटन, डिजिटल बँकिंग सुविधेचा प्रारंभ झाला, त्या वेळी ते बोलत होते. राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगांवकर, बुलडाणा अर्बन बँकेचे संस्थापक-अध्यक्ष राधेश्याम चांडक, संचालक डॉ. किशोर केला उपस्थित होते.
 
श्री. मराठे म्हणाले की, विविध कारणांनी अडचणीत येणार्‍या वित्तीय संस्था एकतर बंद पडतात किंवा इतरत्र विलीन होतात. त्यसाठी तिसरा पर्याय म्हणून शिवनेरी सहकारी बँकेच्या धर्तीवर व्यवस्थापन बदलासह काही विशेष योजना आखून अशा बँकांना बळ देता येईल. या संदर्भातील एक प्रस्तावही लवकरच मांडणार आहोत. बुलडाणा अर्बनप्रमाणेच सहकार क्षेत्रात आदर्शवत काम करून पुणे कमर्शिअल बँकेने ग्राहकांना उत्तमोत्तम सेवा द्यावी. ही बँक निश्‍चितच यशस्वी ठरेल, असा आशावाद चरेगांवकर यांनी व्यक्त केला.
 
बँकेचे अध्यक्ष गिरीश देशपांडे यांनी प्रास्ताविकात बँकेच्या नामांतराची भूमिका आणि आगामी ध्येयधोरणांचा आढावा घेतला. महाराष्ट्र सहकार परिषदेच्या राज्यस्तरीय समितीवर अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल बँकेचे अध्यक्ष शिरीष देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला. राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांच्या मागदर्शनाखाली ही समिती कार्यरत असून विविध सहकारी संस्थांना येणार्‍या अडीअडचणींवर मात करण्यासाठी समन्वय, मार्गदर्शन आणि सुकर वाटचालीचा मार्ग दाखवण्याचे काम करते, असे श्री. देशपांडे यांनी सांगितले. अनिरुद्ध दडके यांनी सूत्रसंचालन केले, तर बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय पाटील यांनी आभार मानले. बँकेचे उपाध्यक्ष विजयराव चव्हाण यांनी गायलेल्या पसायदानाने या कार्यक्रमाचा समारोप झाला.