सहकारातील दूध व्यावसायिकांनी संघटित व्हावे : मराठे

स्रोत: सहकार सुगंध          तारीख:21-Sep-2019

आणंद (गुजरात) : सहकारातील दुग्ध व्यवसाय हे समाज परिवर्तनाचे महत्त्वपूर्ण साधन आहे. या क्षेत्रात देशाने लक्षणीय प्रगती केली असल्याने भविष्यामध्ये दुग्ध व्यवसायातील कार्यकर्त्यांनी संघटित होऊन देशाच्या अर्थव्यवस्थेला अधिक सक्षम करावे, असे आवाहन आरबीआयचे सतीश मराठे यांनी केले आहे.
 
सहकार भारती, इन्स्टिट्यूट ऑफ रूरल मॅनेजमेंट आणि एनडीडीबी (नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड) यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी ते बोलत होते. एनडीडीबीचे अध्यक्ष दिलीप रथ तसेच दुग्ध व्यवसायातील अभ्यासक, तज्ज्ञ आणि बंगाल, आसाम, बिहार, झारखंड, अशा विविध राज्यांतील प्रतिनिधी उपस्थित होते. विशेष म्हणजे नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
 
श्री. मराठे यांनी सांगितले की, दूध व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये देशाने लक्षणीय प्रगती करून आघाडीचे स्थान प्राप्त केले आहे. असे असले तरी या क्षेत्रामध्ये परावलंबित्व येणार नाही, याची काळजी व्यावसायिकांनी घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर अधिकाधिक प्रमाणावर रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध होतील याकडे लक्ष दिले पाहिजे, तरच आर्थिक संपन्नता वाढीस मदत होईल. गेल्या काही वर्षांत एकूणच सहकाराच्या वाढीस देशात मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे या क्षेत्रात नवीन पिढी येण्यास तयार नाही. यासाठीच महिला बचत गटांच्या माध्यमातून व्यवसाय वाढवण्यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.
 
एनडीडीबी अध्यक्ष रथ म्हणाले की, दुग्ध व्यवसाय क्षेत्रातील सहकारी तत्त्वावरील समित्यांची कार्यप्रणाली समान नाही. त्याचा त्या त्या राज्यातील दुग्ध व्यवसायावर परिणाम होतो आहे. काही राज्यांत या समित्यांची संख्या समाधानकारक नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ही संख्या वाढली तर समित्या यशस्वी होतील.