‘बदलते बँकिंग, नव भारतासाठी’ सहकारी बँक परिषद

स्रोत: सहकार सुगंध          तारीख:21-Sep-2019
 
 
 
ठाणे : ‘बदलते बँकिंग नव भारतासाठी’ या संकल्पनेतून नागरी सहकारी बँकांना तंत्रज्ञानाच्या मदतीने विविध सेवा पुरवण्यासाठी तत्पर असलेल्या युनाइट्स बिझनेस सोल्युशन्स कंपनीने नुकतीच ठाणे येथे परिषद घेतली. या परिषदेचे उद्घाटन पंजाब नॅशनल बँकेचे माजी अध्यक्ष के. आर. कामत यांनी केले. या प्रसंगी सीए वरदराज बापट, लक्षवेधचे अतुल राजोळी व युनाइट्सचे संजय ढवळीकर उपस्थित होते.
 
नागरी सहकारी बँकांसमोर बदलत्या बँकिंगचे मोठे आव्हान आहे. त्याचबरोबर ग्राहकदेखील आता बदलला आहे, हे लक्षात घेऊन सहकारी बँकांनी स्वत:मध्ये आमूलाग्र बदल करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन श्री. कामत यांनी केले. या वेळी श्री. बापट म्हणाले की, तंत्रज्ञानाचा पुरेपूर उपयोग करत सहकारी बँकांनी स्थानिक पातळीवर अधिक चांगली ग्राहकसेवा दिली पाहिजे. तसेच ग्राहकांच्या गरजा ओळखून आपल्या कार्यपद्धतीत देखील बदल केला पाहिजे. 
 
या परिषदेमध्ये ‘नव्या पिढीचे बँकिंग’ या विषयावर अल्पेश पटेल यांनी; ‘जोखीम पूर्णता व सेवा कार्यपद्धती’ यावर आशुतोष पेडणेकर यांनी; ‘सहकारी बँकांसाठी योग्य तंत्रज्ञान’ या विषयावर दिलीप टिकले यांनी; ‘सायबर सिक्युरिटी’ या विषयावर राजेश्‍वरी भट्टाचार्य यांनी मार्गदर्शन केले. समारोप सत्रात श्री. राजोळी यांनी सकारात्मक व प्रभावी कार्यपद्धती यावर मार्गदर्शन केले. 
 
श्री. संजय ढवळीकर यांनी युनाइट्स कंपनीद्वारा देत असलेल्या सेवांची माहिती दिली. यामध्ये विविध बँकिंग प्रोसेसमधील पुनर्रचना, बॅकऑफिसमधील सुसूत्रता, विविध प्रोसेसिंग पद्धती, डिजिटायझेशन, ग्राहकसेवा, प्रशिक्षण, प्रोसेस ऑडिट आणि सहकारी बँकांसाठी आउटसोर्सिंगच्या सेवा, या विषयावर माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. भालचंद्र कुलकर्णी यांनी केले.