वाई अर्बन बँकेचा एक हजार कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण

स्रोत: सहकार सुगंध          तारीख:19-Sep-2019
 
 
 
वाई : वाई अर्बन को-आँप. बँकेने ठेवींचा 1000 कोटी रुपयांचा टप्पा पूर्ण केला आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष चार्टर्ड अकौंटंट चंद्रकांत काळे यांनी सांगितली.
 
बँकेचे सभासद, खातेदार, कर्जदार व हितचिंतकांच्या सहकार्याने बँकेने या आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीमध्ये ठेवींचा 1008 कोटी रुपयांचा टप्पा पूर्ण केला आहे. बँकेची कर्जे 669 कोटी इतकी झाली आहेत. खरे तर बँकेने ठेवींचा 1000 कोटी रुपयांचा टप्पा वर्धापनदिनी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. बँकेच्या 30 शाखा कार्यरत असून एकूण व्यवसाय 1676 कोटी रुपये झाला आहे. भारतात नागरी सहकारी बँका 1551 आहेत, देशभरातील 80 नागरी सहकारी बँकांच्या ठेवी 1000 कोटींच्या वर आहेत. त्यामध्ये आता आपल्या बँकेचा समावेश झाला आहे. 
 
बँकेची प्रगती दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. बँकेची स्थापना 1921 साली झाली आहे. गेली 98 वर्षे बँक अविरत कार्यरत आहे. 1995-96 मध्ये बँकेच्या ठेवी 25 कोटी होत्या. 1998 साली 50 कोटी, 2001 साली 100 कोटी, तर 2009 मध्ये 200 कोटी ठेवी झाल्या होत्या. 2011 साली व्यावसायिक विचारांच्या संचालक मंडळाने कारभार हाती घेतल्यानंतर बँकेच्या प्रगतीचा वेग खूपच वाढवला आहे. एकंदरीत गेल्या 10 वर्षांत बँकेच्या ठेवींमध्ये पाचपट इतकी वाढ झाली आहे. कर्जेदेखील 100-150 कोटींवरून 669 कोटींपर्यंत पोहोचली आहेत. तर बँकेची गुंतवणूक 330 कोटींच्या वर आहे, असे काळे यांनी सागितले. 
 
बँकेने शेड्युल्ड बँकेसाठी प्रस्ताव रिझर्व्ह बँकेकडे सादर केला आहे. तसेच बँक मल्टिस्टेटचा प्रस्तावही शासनाकडे पाठविला आहे. दि. 1 जुलैपासून आरटीजीएस, एनईएफटीसाठीचे चार्जेस बंद करणेत आले आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे व्यापारी व सामान्य खातेदारांना त्याचा फायदा होणार आहे. बँकेचे उपाध्यक्ष राजेंद्र चावलानी, ज्येष्ठ संचालक डॉ. विनय जोगळेकर, मदनलाल ओसवाल, अ‍ॅड. प्रतापराव शिंदे, विवेक भोसले, अ‍ॅड. सीए राजगोपाल द्रवीड, विद्याधर तावरे, मनोज खटावकर, प्रा. विष्णू खरे, भालचंद्र देशपांडे, डॉ. शेखर कांबळे, स्वरूप मुळे, सीए किशोरकुमार मांढरे, संचालिका अंजली शिवदे, गीता कोठावळे, सीईओ श्रीपाद कुलकर्णी व बँकेचे संचालक उपस्थित होते.