ग्राहकांनी पतसंस्थांकडूनच कर्ज घ्यावे, सोलापूर जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे आवाहन

स्रोत: सहकार सुगंध          तारीख:16-Sep-2019
सोलापूर: सोलापूर शहर व जिल्ह्यात सावकार आणि फायनान्सवाल्यांनी गरीब व गरजू लोकांना अव्वाच्या सव्वा व्याजाने पैसे देण्याचा धंदा जोरात सुरू ठेवला आहे. सावकारी लोकांना तसेच फायनान्सवाल्यांना कायदेशीरदृष्ट्या ठेवी स्वीकारता येत नाहीत. ठेवी स्वीकारणार्‍यांवर फौजदारी दाखल करा, अशी मागणी सोलापूर जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने दिलीप पतंगे यांनी जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख यांच्याकडे केली आहे. 
 
अधिक माहिती देताना फेडरेशन अध्यक्ष दिलीप पतंगे म्हणाले की, सोलापुरात फायनान्सवाल्यांनी अनेकांना चुना लावला असून याचा फटका गरीब व गरजू लोकांना बसला आहे. सहकार विभागाच्या दुर्लक्षामुळे अशी प्रकरणे घडत आहेत. सावकारी परवान्याखाली अनेक लोक फायनान्स चालवत आहेत.
 
सावकारी कायद्याचे पालन सावकारांकडून होत नसताना त्यांना नव्याने परवाने दिले जात आहेत. त्यामुळे सावकारांचा धंदा तेजीत आहे. सावकारांविरोधात तसेच फायनान्सवाल्यांच्या विरोधात सोलापूर जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनकडून जनजागृती करण्यात येणार आहे. लोकांनी खासगी सावकारांकडे कर्ज काढण्यापेक्षा त्यांनी जवळच्या सहकारी पतसंस्थांकडे कर्जाकरिता अर्ज करावा. गरजू लोकांना तत्काळ कर्ज देण्याची सुविधा अनेक पतसंस्थांमध्ये आहे, असे ते म्हणाले.