सहकारी बँक वेतन मंडळाची भूमिका महत्त्वाची : सतीश मराठे

स्रोत: सहकार सुगंध          तारीख:14-Sep-2019

 
 
पुणे : सहकारी बँका या चांगल्या रीतीने चालाव्यात यासाठी चांगले औद्योगिक संबंध असणे आवश्यक आहे. त्यासाठी सहकार बँक वेतन मंडळ महत्त्वाची भूमिका पार पाडेल, असे मत रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे यांनी व्यक्त केले.
 
राज्य सहकारी बँक वेतन मंडळ सदस्यांचा एक दिवसीय अभ्यासवर्ग येथे झाला. अभ्यासवर्गाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. सहकारी बँका मोठ्या प्रमाणावर कर्ज वितरणाचे काम करतात. त्याचबरोबर रोजगार निर्मिती केली जाते. बँकांचे दैनंदिन कामकाज चांगले चालण्यासाठी बँक व्यवस्थापनाबरोबर कर्मचार्‍यांचे महत्त्वाचे योगदान असते, हे लक्षात घेता बँक वेतन मंडळ योग्य प्रकारे काम करेल, असे ते म्हणाले.
 
भारतीय मजदूर संघ प्रदेशाने अभ्यासवर्गाचे आयोजन केले होते. यासाठी भा. म. संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब फडणवीस, उदयराव पटवर्धन, अ‍ॅड. धनंजय भणगे, प्रदेशाध्यक्ष अण्णा धुमाळ या वेळी व्यासपीठावर होते.
 
मंडळ अध्यक्ष अ‍ॅड. अनिल ढुमणे यांनी प्रास्ताविकात मंडळाचा सन 1948 पासूनचा आढावा घेतला. महाराष्ट्र औद्योगिक संबंध अधिनियम कायद्यातील मंडळाबाबतच्या तरतुदी व कामकाज पद्धती यांबाबत अ‍ॅड. भणगे यांनी माहिती सांगितली.
 
अभ्यासवर्गाच्या समारोपात श्री. पटवर्धन यांनी वेतन मंडळाची भूमिका व महत्त्व यावर भर दिला. ते म्हणाले की, सन 2019-2020 हे वर्ष स्व. दत्तोपंत ठेंगडी यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यांनी संपूर्ण जीवन श्रमिक वर्गाच्या हितासाठी व्यतित केले. भा. म. संघाच्या कार्यासाठी आयुष्य वेचले. या जन्मशताब्दी वर्षात सहकारी बँक कर्मचारी महासंघाचे काम वाढायला हवे यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे ते म्हणाले.
 
भा. म. संघाचे महामंत्री रवींद्र देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. मोहन येगुदे यांनी आभार मानले.
कार्यक्रमास मंडळाचे व्यवस्थापन प्रतिनिधी सदस्य अच्युतराव कर्‍हाडकर, प्रदीप जगताप, भगवान पाटील, प्रवीण दटके, आशिष नावंदर तसेच कर्मचारी प्रतिनिधी सदस्य विजय भोगल, मोहन येणुरे, रवींद्र सहस्रबुद्धे, भारत तांबोळकर, संजू देशपांडे, प्रसाद पोटभरे, चंद्रशेखर मैडकर उपस्थित होते. त्याशिवाय प्रकाश रानडे, रवींद्र पुरोहित, विविध सहकारी बँकांचे व्यवस्थापन प्रतिनिधी, संचालक, सहकारी बँक कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी आदी 52 प्रतिनिधी उपस्थित होते.