साखर उद्योगाने उपपदार्थ निर्मितीकडे वळण्याची गरज

स्रोत: सहकार सुगंध          तारीख:02-Nov-2019

 
 
साखर उद्योग जिवंत राहायचा असेल तर साखर कारखान्यांनी आता इथेनॉल उत्पादनाकडे मोठ्या प्रमाणावर वळणे गरजेचे आहे, असा गर्भित इशारा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिला आहे. या इशार्‍यामागे केवळ साखर कारखानदारांमध्ये भीती निर्माण करणे हा उद्देश नाही, तर भविष्यातील नेमकी गरज काय आहे याची जाणीव करून देण्याचा हा एक सकारात्मक प्रयत्न होता. निमित्त होते राज्य सहकारी बँकेच्या वतीने प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय साखर परिषदेचे. 
 
यंदाच्या उसाच्या गाळप हंगामात संपूर्ण देशात साखरेचे विक्रमी उत्पादन झाले असले तरी साखर उद्योगासमोरील अडचणी कमी न होता उलट त्यात वाढ झाली आहे. केवळ अतिरिक्त साखर कोठे ठेवायची आणि तिची विक्री कशी करायची हा प्रश्‍न नाही, तर यापेक्षा अनेक प्रश्‍नांनी या उद्योगाला वेढले असल्याचे दिसते आहे आणि हे दुखणे या वर्षीचे नाही तर दरवर्षी त्यात कमी न होता वाढ होत असल्याने साखर उद्योगावर बदलत्या परिस्थितीमध्ये विचार करण्यासाठी आणि मुख्य म्हणजे हा उद्योग जिवंत ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना होणे गरजेचे आहे. तीन दिवसीय साखर परिषदेत सद्यःस्थितीबाबत सविस्तर विचारविनिमय होऊन निश्‍चित स्वरूपाचे धोरण ठरवण्यात आले आहे. आता गरज आहे त्याच्या प्रभावी अंमलबजावणीची. 
 
विविध बाबींचा विचार व्हावा - संपूर्ण देशाचा विचार करता सुमारे साडेपाच ते सहा कोटी ऊस उत्पादक शेतकरी या साखर उद्योगाशी निगडित आहेत. त्या त्या राज्यातील पाण्याची उपलब्धता, त्याचे नियोजन, उसाचे वाण, गाळप हंगामाचा कालावधी, साखर उत्पादनाची उपलब्धता, सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांची संख्या, साखरेखेरीज अन्य उपपदार्थ उत्पादनांवर दिला जाणारा भर, एफआरपी समस्या, उसाची उपलब्धता, साखर निर्यात, आजारी साखर कारखाने, बंद पडलेले साखर कारखाने, ठिबक सिंचनाची गरज, साखरेचे पडणारे दर, त्याचा उत्पादन खर्च, आंतरराष्ट्रीय बाजारातील डॉलरचा दर आणि साखर कारखान्यांवरील बँकांची कर्जे, ऊस तोडणी, असे अनेक प्रश्‍न या उद्योगासमोर आहेत आणि त्यातही प्रत्येक राज्यातील प्रश्‍नांमध्ये कमी अधिक प्रमाणात तफावत दिसून येते. असे असले तरी संपूर्ण देशात साखरेच्या दरात साधारणपणे समानता आहे. म्हणजेच सर्वसामान्य ग्राहकांना घरगुती वापरासाठी लागणारी साखर, तिचा दर आणि व्यावसायिक कारणासाठी वापरण्यात येणार्‍या साखरेचा दर यांमध्ये फारशा प्रमाणात तफावत दिसून येत नाही. खरे तर एकूणच साखर उद्योग हा अर्थव्यवस्थेमधील महत्वपूर्ण असा घटक आहे. या सर्व प्रश्‍नांची साधक-बाधक चर्चा या परिषदेच्या निमित्ताने झाली हे जरी वास्तव असले तरी या परिषदेचे नेमके फलित काय, असा प्रश्‍न उपस्थित होतोच. आणि या प्रश्‍नातील एक उत्तर म्हणजेच साखर उद्योगाने आता साखरेच्या बरोबरीने अन्य उपपदार्थाच्या उत्पादनाकडे वळणे अनिवार्य झाले आहे; तरच भविष्यातील आव्हाने हा साखर उद्योग यशस्वीपणाने पेलू शकणार आहे. नेमके हेच सूत्र केंद्रीय मंत्री गडकरी यांनी साखर उद्योगासमोर ठेवले आहे. 
 
साखर दरातील तफावत - ब्राझीलमध्ये साखरेचा दर हा प्रतिकिलो 22 ते 23 रुपये आहे, तर भारतात प्रतिकिलोचा दर 35 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त आहे. मुळात सरकारने साखरेचा दर 3100 रुपये नक्की केला आहे पण प्रत्यक्षात साखरेचा उत्पादन खर्च हा त्यापेक्षा अधिक आहे. मग परवडणार कसे? काही वर्षांपूर्वी हाच दर 1900 ते 2000 रुपये इतका खाली आला होता. ग्राहकांना जरी कमी दरात साखर उपलब्ध झाली तरीदेखील ऊस उत्पादकांची देणी आणि अन्य खर्चाची तोंडमिळवणी होणे शक्य आहे काय? ही कारखानदारांची बाजू झाली. पण त्याचबरोबर ऊस उत्पादकांची रखडलेली देणी, थकबाकीची रक्कम याचाही साकल्याने विचार होणे गरजेचे आहे. त्यातल्या त्यात एक चांगले आहे, ते म्हणजे या वर्षी महाराष्ट्रातील सुमारे 97 टक्के कारखान्यांनी एफआरपीची रक्कम अदा केली आहे. पण दरवर्षी हेच चित्र असेल हे ठामपणाने सांगता येत नाही. म्हणजेच एका अर्थाने कारखान्यांनी अन्य खर्चांत बचत करण्याप्रमाणे साखरेच्या उत्पादनाचाही खर्च कमी करण्यावर भर दिला पाहिजे. त्यासाठी विविध स्वरूपांच्या उपाययोजना करण्याची गरज आहे. त्यासाठी ऊस गाळपाच्या कालावधीतील भिन्नता कमी करणे, उसाचे साखरेत रूपांतर करण्यासाठी जो खर्च करण्याची गरज आहे त्यावर नियंत्रण ठेवणे याचाही गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे घरगुती आणि व्यावसायिक कारणांसाठी वापरण्यात येणार्‍या साखरेच्या दराबाबत कायमस्वरूपी तोडगा निघणे आवश्यक आहे. कारण सध्याच्या स्थितीत एकच दराने दोन्ही घटकांसाठी साखरेची विक्री होते आहे, हे कितपत व्यवहार्य ठरणारे आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे. आजमितीला सुमारे 20 ते 25 टक्के साखरेचा वापर हा घरगुती कारणासाठी आणि उर्वरित साखर म्हणजेच 70 ते 75 टक्के साखर व्यावसायिक कारणासाठी वापरण्यात येत आहे. हे समीकरण जुळणारे आहे का? 
 
अन्य उत्पादनांचा विचार आवश्यक - सध्याची स्पर्धा आणि त्यातील साखर कारखानदारीचे अस्तित्व हा महत्त्वपूर्ण असा टप्पा आहे. त्याचे कारण म्हणजे दिवसेंदिवस या उद्योगासमोरील प्रश्‍नांची मालिका वाढत आहे. यावर वेळीच उपाययोजना झाली तर हा उद्योग प्रदीर्घ काळापर्यंत टिकणार आहे. त्यासाठी साखर कारखानदारीने रुपडे वेळीच बदलण्याची गरज आहे. साखरेप्रमाणे कारखान्यांनी इथेनॉल, सहवीज निर्मिती, बायोडिझेल, बायोसीएनजी याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. कारण याच गोष्टींची खरी गरज आहे. त्याचे कारण प्रत्येक वेळी उत्पादित करण्यात आलेल्या साखरेची विक्री होईल याची खात्री नाही. त्यामुळे पडून राहणार्‍या साखरेचा खर्च, व्याजाचे ओझे आणि करण्यात आलेली गुंतवणूक हे गणित परवडणारे नाही. आणि यावर उपाय म्हणजे साखर कारखानदारीने वेगळी वाट धरण्याची गरज आहे. कारण यामध्ये गुंतवणुकीची बचत होणार आहे. इथेनॉल किंवा अन्य उपपदार्थांना असणारी बाजारपेठ मोठी आहे. पण त्यासाठी कारखानदारांनी मानसिकता बदलण्याची गरज आहे. तरच या उद्योगाला भविष्यात चांगले दिवस येणे शक्य आहे. जे साखर कारखाने काही कारणाने बंद आहेत त्यांची नव्याने सुरुवात करण्यासाठी त्या ठिकाणी इथेनॉल उत्पादन प्रकल्प हाती घेतले तर फायद्याचे ठरणार आहे. 
 
विनायक कुलकर्णी, पुणे
मो.ः 94223 21626