नागरी बँकांच्या अडचणी राज्य सहकारी बँक सोडवणार

स्रोत: सहकार सुगंध          तारीख:02-Nov-2019

 
 
पुणे : नागरी सहकारी बँकांसमोरील प्रश्‍नांचा राज्य शासन व रिझर्व्ह बँकेकडे पाठपुरावा करून त्या सोडविण्यासाठी शिखर बँक म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी बँक सहकार्य करेल, अशी ग्वाही बँकेचे प्रशासक अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी दिली. जिल्ह्यातील नागरी सहकारी बँकांना भेडसावणार्‍या अडचणींवर उपाययोजना करण्यासाठी राज्य सहकारी बँकेने चर्चासत्र आयोजित केले होते, त्या वेळी श्री. अनास्कर मार्गदर्शन करीत होते. 
 
राज्य सहकारी बँकेच्या प्रशासक समितीचे सदस्य अविनाश महागांवकर, संजय भेंडे, पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. सुभाष मोहिते, उपाध्यक्ष अ‍ॅड. साहेबराव टकले यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री. अनास्कर म्हणाले, “नागरी सहकारी बँका आणि राज्य सहकारी बँकेने एकत्र येऊन काम करण्याची आवश्यकता आहे. या बँकांना कर्जपुरवठा, माहिती-तंत्रज्ञान आणि सायबर सुरक्षितता या विषयामध्ये तज्ज्ञांमार्फत राज्य सहकारी बँक मार्गदर्शन करणार आहे. नागरी सहकारी बँकांच्या प्रगतीसाठी राज्य सहकारी बँकेने विविध योजना हाती घेतल्या आहेत. बँकांना आर्थिक हमी, सभासदांसाठी आयात-निर्यात व्यवहार, विदेश विनियम व्यवहारासाठी अधिकृत डीलर, नागरी बँकांच्या सहभागात कर्ज, राज्य बँकेतर्फे कर्जपुरवठा, मुख्य कचेरीची इमारत किंवा शाखा संगणकीकरणासाठी कर्ज, वितरित केलेल्या घरकर्जापोटी राज्य बँकेच्या स्वसाधन संपत्तीतून फेरकर्ज, कॅश क्रेडिट कर्ज पुरवठा, सहकारी गृहनिर्माण संस्थांना तसेच वैयक्तिक लाभधारकांना नवीन इमारत बांधकामासाठी कर्ज, आरटीजीएस/एनईएफटीची वेगवान सेवा, प्रशिक्षण केंद्र आदी सुविधा राज्य सहकारी बँकेच्या वतीने नागरी बँकाना देण्यात येणार आहेत.’’
 
मंगेश कोलवाडकर यांनी सूत्रसंचालन केले. संजय भेंडे यांनी प्रास्ताविक भाषण केले. अविनाश महागावकर यांनी आभार प्रदर्शन केले.