पंचगंगा सहकारी बँकेच्या करपूर्व नफ्यात लक्षणीय वाढ

स्रोत: सहकार सुगंध          तारीख:02-Nov-2019

 
 
कोल्हापूर : पंचगंगा बँकेची 48 वी वार्षिक सर्वसाधारण सभा येथे झाली. सभासद, ग्राहक, हितचिंतक यांनी दाखविलेल्या बँकेवरील विश्‍वासाने, कर्मचार्‍यांच्या प्रयत्नांनी व सहकारी संचालकांच्या योगदानाने बँकेने गत आर्थिक वर्षांत 3 कोटी 92 लाख एवढा करपूर्व नफा मिळविला व शून्य टक्के एनपीए राखण्यात यश मिळविले आहे. लेखापरीक्षणात सातत्याने बँकेस ‘अ’ वर्ग मिळाला आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष राजाराम शिपुगडे यांनी अध्यक्षीय मनोगतात सांगितली. त्यांनी बँकेच्या गेल्या वर्षभरातील महत्त्वपूर्ण उपलब्धींचा आढावा घेतला.
 
अहवाल वर्षात बँकेच्या एकूण ठेवी 252.23 कोटी झाल्या व कर्जे 164.23 कोटी झाली आहेत. बँकेस करपूर्व नफा रु. 3.92 कोटी झाला असून पैकी रु. 1.80 कोटी आयकर भरणा करून निव्वळ नफा रु. 2.11 कोटी झाला आहे व 10 टक्के लाभांश जाहीर केला आहे. वेगाने विकसित होत असलेल्या आधुनिक बँकिंग या क्षेत्रामध्ये आता आपली पंचगंगा बँक अधिक वेगाने ग्राहकसेवेसाठी आधुनिक झाली आहे. सर्व शाखांमध्ये एटीएम सुविधेबरोबरच मोबाइल बँकिंग सुविधादेखील सुरू केली आहे; ज्याद्वारे आपल्या बचत खाते, कर्ज खाते व ठेवींची माहिती घेणे, आपल्या बँकेतील इतर खात्यांवर किंवा दुसर्‍या बँकेतील खात्यांवर पैसे ट्रान्सफर करणे तसेच आरटीजीएस/एनईएफटी फंड ट्रान्सफर सुविधांचा लाभ ग्राहक त्यांच्या घरातून अथवा व्यवसायाच्या ठिकाणाहून सहजपणे घेऊ शकतो. ई-लॉबीच्या माध्यमातून एटीएम, पासबुक प्रिंटिंग, कॅश डिपॉझिट मशीनसह चेक कलेक्शन इ. सुविधा 24 तास उपलब्ध करून दिल्या आहेत, असे ते म्हणाले.
 
वर्षभरात निधन पावलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मागील सभेचे इतिवृत्त महाव्यवस्थापक सुशील कुलकर्णी यांनी वाचून दाखविले व अहवाल वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक फडणीस यांनी केले. उपाध्यक्ष राहुल भोसले यांनी आभार मानले. सभेस बँकेचे संचालक पी.एस. कुलकर्णी, विकास परांजपे, भालचंद्र साळोखे, दिगंबर जोशी, चंद्रशेखर जोशी, चंद्रशेखर धर्माधिकारी, उपेंद्र सांगवडेकर, संदीप पाटील, नंदकुमार दिवटे, विजय चव्हाण, विवेक शुक्ल, केशव गोवेकर व संचालिका वृषाली बंकापुरे तसेच सभासद उपस्थित होते.