राजाभाऊ मंत्री पतसंस्थेच्या वार्षिक साधारण सभेत 15 टक्के लाभांश जाहीर

स्रोत: सहकार सुगंध          तारीख:02-Nov-2019
 
जळगाव : एरंडोल तालुक्यातील कै. राजाभाऊ मंत्री ग्रा. बि. शेती पतसंस्थेची 28 वी वार्षिक साधारण सभा संस्थेचे अध्यक्ष किशोर मंत्री यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. सभेत मागील सभेचे इतिवृत्त, जमाखर्च, ताळेबंद, नफातोटा, पत्रक, तेरीज, नफावाटणी, अंदाजपत्रक, अंदाजपत्रकापेक्षा जास्त झालेल्या खर्चास मंजुरी देणे, लेखा परीक्षकाची नियुक्ती व मेहनताना, लेखा परीक्षण अहवाल व दोषदुरुस्ती अहवालास मंजुरी देणे, कर्जव्याजाच्या सुटीचा अहवाल सादर करणे, वार्षिक सभेस अनुपस्थित असलेल्या सभासदांना क्षमापित करणे तसेच संचालक व कर्मचारी व त्यांचे नातेवाईक यांचेकडील येणे कर्जांचा अहवाल सादर करणे इत्यादी विषयांस मंजुरी देण्यात आली.
 
संस्थेच्या सर्व सभासदांचा 1 लाख रु.चा अपघात विमा उतरविणे तसेच सभासदाचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या अंत्यविधीसाठी रुपये दहा हजारांची मदत संस्थेतर्फे देणे इ. विषयांनादेखील एकमताने मंजुरी देण्यात आली. मागील वर्ष हे दुष्काळचे वर्ष असूनदेखील संस्थेस आर्थिक वर्षात चढत्या क्रमाने विक्रमी असा नफा रुपये 36,22,181/- एवढा झाला आहे. सभासदांना या वर्षी 15 टक्के लाभांश देण्यात येणार आहे.
 
संस्थेची दुमजली इमारत, स्वतःचे स्ट्राँगरूम, कर्मचार्‍यांना सेवानियम लागू, लॉकर सुविधा, डी.डी.सुविधा, सभासदांना किंवा सभासदाच्या मुलास कन्यारत्न प्राप्त झाल्यास रुपये 1000/- दामदुप्पट रुपये 2000/- ची पावती भेट, भव्य फर्निचर, 100 टक्के संगणकीकरण, नवीन अद्ययावत जेजेआयटीचे सॉफ्टवेअर, ही संस्थेची मुख्य वैशिष्ट्ये आहेत.