नागपुर नागरिक सहकारी बँकेच्या एनपीएमध्ये घट

स्रोत: सहकार सुगंध          तारीख:02-Nov-2019

 
 
 
नागपूर : चालू आर्थिक वर्षात ठेवी आणि कर्जवाटप मिळून 2289 कोटींची लक्ष्यपूर्ती केली आहे. बँकेने यंदा प्रभावी वसुली व्यवस्थापनाद्वारे एनपीए कमी करण्यात प्रगती केली असून 5.57 कोटी नफ्यासह मागील वर्षीच्या तुलनेत लाभक्षमतेत उल्लेखनीय वाढ केली आहे.
 
नागपुर नागरिक सहकारी बँकेच्या 57 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला संबोधित करताना अध्यक्ष प्रा. संजय भेंडे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष गोडबोले यांनी ही माहिती सांगितली.
 
प्रथमच बँकेने आपल्या बीएसएनएल आणि मोबाइल फोनधारकांसाठी बँकेच्या वैशिष्ट्यांविषयी स्वतःची कॉलर ट्यून तयार केली असून त्याचे लोकार्पण सभासदांसमोर करण्यात आले. अध्यक्षीय मनोगतात प्रा. भेंडे यांनी सांगितले की, बँकेच्या गडचिरोली शाखेचे कामकाज नुकतेच प्रारंभ झाले असून गडचिरोलीतील स्थानीय रहिवासी, व्यापारी यांनी अधिकाधिक खाते उघडून नवीन शाखेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. नवीन आर्थिक वर्षात बँकेची भंडारा जिल्ह्यात तुमसर आणि नागपूर शहरात दिघोरी येथे शाखा सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. बँकेच्या अधिकाधिक शाखा या स्वमालकीच्या वास्तूत कार्यरत असून बँकेने अलीकडेच दीनदयालनगर, गिट्टीखदान आणि महाल शाखा या शाखांचे कॉर्पोरेट स्तरावर नूतनीकरण केल्याची माहिती त्यांनी या वेळी सांगितली.
 
तंत्रज्ञान क्षेत्र आणि सायबर सुरक्षेत बँकेची कामगिरी लक्षणीय असून या वर्षी बँकेने 15 हजारांहून अधिक ग्राहकांना प्लॅटिनम एटीएम कार्ड वितरीत केले आहे. ग्राहकांना आधुनिक बँकिंग सेवा देण्यासाठी लवकरच बँक इन्फोसिस कंपनीचे फिनॅकल-10 हे नवीन आणि सुरक्षित सॉफ्टवेअर आत्मसात करणार आहे. सामाजिक कार्यक्रमांतही बँकेने योगदान कायम ठेवीत यंदा हेडगेवार स्मारक समितीला नवीन अर्टिगा वाहन, सरस्वती मंदिरद्वारा संचालित मूक बधिर विद्यालयाला 2 लाख रुपयांचे अनुदान, सामाजिक संस्थांना ई-वेस्टचे वितरण, रक्तदान-देहदानाविषयी कर्मचार्‍यांकडून संकल्पपत्र आदी उपक्रमाविषयी त्यांनी स्पष्ट केले.
 
बँकेचे संस्थापक संचालक नाथमामा काळे यांनी नुकतीच वयाची शंभरी पूर्ण केल्याबद्दल तसेच अध्यक्ष प्रा. भेंडे हे नुकतेच नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन बँक्स अ‍ॅन्ड क्रेहिट सोसायटी (नॅफकब) आणि को-ऑपरेटिव्ह बँक्स ऑफ इंडिया या राष्ट्रीय संस्थांवर संचालक म्हणून निवडून आल्याबद्दल त्यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. चांद्रयान-2 च्या यशस्वी प्रक्षेपणासाठी सभेत पंतप्रधानांसह सर्व वैज्ञानिकांचे अभिनंदनही करण्यात आले.
 
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष गोडबोले यांनी सभेची कार्यवाही पार पाडली. सभासद सर्वश्री विश्‍वास इंदूरकर, प्रमोद पेंडके, विलास लखोटिया, विजय खंडेलवाल आदी सभासदांनी विचारलेल्या प्रश्‍नांना श्री. भेंडे यांनी समाधानकारक उत्तरे दिली.
सभेला उपाध्यक्ष राजेश लखोटिया, संचालक मंडळातील सदस्य, बँकेचे वैधानिक अंकेक्षक मे. रोडी डबीर अ‍ॅन्ड कंपनी, पूर्व अध्यक्ष गोविंदलालजी सारडा तसेच बँकेचे सभासद, भागधारक आणि अधिकारी वर्ग आदी मोठ्या संख्येत उपस्थित होते.