खासगी बँकांप्रमाणे पतसंस्थांनी सिबिल प्रणाली वापरावी

स्रोत: सहकार सुगंध          तारीख:02-Nov-2019

 
 
सोलापूर : क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्यूरो इंडिया लिमिटेड म्हणजेच सिबिल ही जगभरातील कर्जदारांची माहिती पुरविणारी संस्था आहे. कर्ज मागणी करणार्‍यांची क्षमता, त्यांचा पूर्वेतिहास आणि परतफेडीची मानसिकता या प्रणालीतून कळते. खासगी बँकांप्रमाणे सहकारी पतसंस्थांनी देखील सिबिल प्रणालीचा वापर करावा, असे आवाहन कोपास कंपनीचे मोहन ननावरे यांनी केले आहे.
 
सोलापूर जिल्हा पतसंस्था फेडरेशन आणि कोपास टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कार्यशाळेत कोपास कंपनीचे घनश्याम पाटील, मोहन ननावरे, जितेंद्र किणे आणि कृणाल सिंघवी यांनी सिबिल प्रणालीविषयी मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे उद्घाटन महापौर शोभा बनशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप पतंगे यांनी प्रास्ताविक केले. 
पतसंस्था फेडरेशनचे सचिव मल्लिकार्जुन केंदुळे यांच्यासह पतसंस्थांचे संचालक आणि व्यवस्थापक उपस्थित होते.
 
सिबिलशिवाय सोने तारण कर्ज प्रकरणाची माहितीही या कार्यशाळेत देण्यात आली. ग्राहकांकडील सोने सराफामार्फत तपासून घेणे, त्याचे मूल्यमापन करणे अशी पद्धत आहे. या प्रक्रियेला वेळ लागतो. ही बाब हेरून एसीझेट या कंपनीने गोल्ड टेस्टिंग मशीन बाजारात आणले आहे. त्याने काही सेकंदांत सोन्याची शुद्धता, त्याचे बाजारातील मूल्य या बाबी स्पष्ट होतात. सोने तारण कर्ज सुरक्षित असते. परंतु तितकीच जबाबदारीदेखील असते. त्यामुळे या उपकरणाचा वापर पतसंस्थांनी करून घ्यावा, असे आवाहन कृणाल संघवी यांनी केले आहे.