कुंडलिका पतसंस्थेतर्फे गुणवंतांचा सन्मान

स्रोत: सहकार सुगंध          तारीख:02-Nov-2019
 
रोहा : गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांबरोबरच 38 वर्षे विनाअपघात सेवा करून जनतेच्या जिवाची काळजी घेणार्‍या एका राज्य परिवहन चालकाचा गौरव करून कुंडलिका पतसंस्थेने समाजाचे ऋण फेडले आहे. ‘नाते आपुलकीचे ठेवा विश्‍वासाचा’ हे ब्रीदवाक्य सार्थ ठरविणार्‍या कुंडलिका पतसंस्थेने लोकांचा विश्‍वास जिंकला आहे, असे दि अण्णासाहेब सावंत अर्बन बँक महाडच्या अध्यक्षा शोभा सावंत यांनी सांगितले.
 
कुंडलिका पतसंस्थेच्या सर्वसाधारण सभेप्रसंगी आयोजित केलेल्या गुणगौरव कार्यक्रमात त्यांनी मार्गदर्शन केले. गेली 49 वर्षे 10 वीच्या विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करणारे गजानन मळेकर, 20 वर्षे दुर्गम अशा आदिवासी पाड्यांवर राहून त्यांच्याच भाषेत अध्ययन पुस्तिका निर्मिती करणारे गजानन जाधव, क्रीडा प्रशिक्षण व आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते तात्यासाहेब जाधव, 38 वर्षे विनाअपघात एसटी बस चालविणारे संतोष दाते यांचा गौरव करण्यात आला. सत्कारास उत्तर देताना गजानन जाधव, तात्यासाहेब जाधव व संतोष दाते यांनी संस्थेचे आभार मानले.