शेंदुर्णी : समाजातील सर्व घटकांना साथ देणार्या राणी लक्ष्मीबाई महिला सहकारी पतसंस्थेतर्फे सालाबादप्रमाणे यंदाच्या शैक्षणिक वर्षातही सरस्वती विद्या मंदिरात गरजू विद्यार्थ्यांना शालेय वह्यांचे वाटप करण्यात आले.
अध्यक्षस्थानी पतसंस्थेच्या उपाध्यक्षा साधना फासे, तर प्रमुख पाहुणे संस्थेचे तज्ज्ञ संचालक फर्डे वक्ते, अभ्यासू कार्यकर्ते उत्तमराव थोरात, वि. हिं. प. च्या समरसता विभागाचे सदस्य वामनराव फासे, मुख्याध्यापक राजेंद्र पाटील, रा. स्व. संघाचे तालुका संघचालक उमाकांत भगत, जनकल्याण समितीचे जिल्हा कार्यवाह किशोर वाघ, रा. स्व. संघाचे तालुका कार्यवाह गजानन पवार, संस्थेचे तज्ज्ञ सल्लागार अतुल जहागीरदार, शीतल जैन आदी उपस्थित होते. उमाकांत भगत यांनी ‘जीवन में कुछ करना है, तो मनको मारे मत बैठो’ गीत सादर केले. मान्यवरांच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी मुख्याध्यापक राजेंद्र पाटील यांनी समाजातील गरजूंना वेळोवेळी मदतीचा हात देणारी ही पतसंस्था आहे. शिक्षण घेणार्या गरजू विद्यार्थ्यांना वह्यांच्या रूपाने मदतीचा व पाठीवर शाबासकीचा हात देणारी पतसंस्था आहे, असे प्रास्ताविकात स्पष्ट केले. किशोर वाघ म्हणाले की, समाजाच्या वेदना या आपल्या वेदना आहेत. जीवन साफल्य असा भाव सदैव मनात ठेवून राणी लक्ष्मीबाई महिला पतसंस्था 28 वर्षांपासून कार्य करीत असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन उपशिक्षक दिलावर तडवी यांनी केले, तर आभार जयेश सुरवाडे यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पतसंस्थेचे कर्मचारी कडोबा चौधरी, किशोर चौधरी आदी उपस्थित होते.