थकीत रकमेसाठी नाशिक जिल्हा बँकेवर पतसंस्थांचे आंदोलन

स्रोत: सहकार सुगंध          तारीख:02-Nov-2019
 
नाशिक : जिल्हा बँकेत ठेव, राखीव निधी आणि तत्सम स्वरूपात ठेवलेली 300 कोटींहून अधिकची रक्कम मिळत नसल्याने जिल्ह्यातील शेकडो पतसंस्थांवर आर्थिक संकट आले आहे. जिल्हा बँकेने बेकायदेशीरपणे वाटलेल्या कर्जाचा फटका प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे पतसंस्थांना बसला आहे. परिणामी, ग्रामीण भागातील पतसंस्थांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. कोट्यवधींची रक्कम व्याजासह परत मिळावी, यासाठी पतसंस्थांच्या पदाधिकार्‍यांनी जिल्हा बँकेच्या मुख्यालयावर आंदोलन केले.
 
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन आणि नाशिक विभागीय पतसंस्था फेडरेशनच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेच्या मुख्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, विभागीय पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष वसंत लोढा, संचालिका अ‍ॅड. अंजली पाटील आदींच्या नेतृत्वाखाली पतसंस्थांचे संचालक, कर्मचारी, अल्पबचत प्रतिनिधी/आंदोलनात सहभागी झाले होते.
 
नागरी पतसंस्थांच्या जोडीला पगारदार पतपेढ्यादेखील अडचणीत आल्या आहेत. निवृत्त होणार्‍या कर्मचार्‍यांना सोसायटी, पतपेढीतून निवृत्तिवेतन मिळते. या संस्थांचे सर्व व्यवहार जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत चालतात. त्यांची रक्कम जिल्हा बँकेत अडकल्याने निवृत्ती वेतनधारक अडचणीत आले आहेत. अडकलेली रक्कम देण्यासाठी शासनाने मदत करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. आंदोलनानंतर आंदोलकांनी विविध मागण्यांचे निवेदन सहकार खात्याच्या विभागीय आयुक्तांना दिले.