भाग्यलक्ष्मी महिला बँक आयोजित प्रशिक्षण वर्ग यशस्वी

स्रोत: सहकार सुगंध          तारीख:02-Nov-2019
 
नांदेड : नागरी सहकारी बँकांच्या समस्या संघटित होऊन सोडविता येऊ शकतील आणि यासाठी संघटित होणे आवश्यक असल्याचे शरयूताई हेबाळकर यांनी स्पष्ट केले. दि भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त सहकार भारती आणि भाग्लक्ष्मी बँक यांच्या विद्यमाने शंकर नागरी सहकारी बँकेत अधिकारी व संचालकांसाठी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.
 
या वर्गाचे उद्घाटन सहकार भारतीच्या देवगिरी संभाग आणि दीनदयाळ बँकेच्या अध्यक्षा शरयूताई हेबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले, त्या प्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी भाग्यलक्ष्मी बँकेच्या अध्यक्षा रेखाताई मोरे या होत्या. व्यासपीठावर विद्याधर दंडवते (जळगाव), श्री. विनोद खर्चे (परळी), सहकार भारती नांदेडचे रमेश शिंदे, भाग्यलक्ष्मी बँकेचे उपाध्यक्ष प्रभाकर महाजन होते.
 
नागरी बँकांसमोरील आव्हाने, आरबीआयच्या नव्या धोरणाचे बँकांवर होणारे परिणाम, शासनाचे सहकारी बँकांसाठीचे अनेक फायदे, ऑनलाइन व्यवहारातील फायदे-तोटे, सायबर सिक्युरिटी व सध्याच्या आर्थिक घडामोडींवर प्रशिक्षण वर्गात चर्चा करण्यात आली. या समस्या नागरी बँका संघटित झाल्यास सहज सोडविता येतील व उत्तम बँकसेवा देता येईल, असे हेबाळकर म्हणाल्या.
 
जनसेवा सहकारी बँकेचे सहसरव्यवस्थापक शिरीष पोळेकर यांनी अधिकार्‍यांना, तर जळगाव जनता बँकेचे विद्याधर दंडवते व वैद्यनाथ बँकेचे सीईओ विनोद खर्चे यांनी संचालकांच्या प्रशिक्षण वर्गात मार्गदर्शन केले. प्रशिक्षण शिबिरात एकूण 105 अधिकार्‍यांनी तसेच संचालकांनी भाग घेतला.
 
प्रास्ताविक भाग्यलक्ष्मीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर कुलकर्णी व मुख्याधिकारी श्रीकांत वैद्य यांनी केले. या वेळी नांदेड मर्चंट बँकेचे अध्यक्ष गोवर्धन बियाणी, गोदावरी बँकेचे अध्यक्ष आर. डी. देशमुख, मार्कण्डेय बँकेचे अध्यक्ष सतीश राखेवार, शंकर नागरी बँकेचे संचालक देशमुख, सहकार भारतीचे नांदेड जिल्हा प्रमुख रमेश शिंदे इ. चा बँकेच्या वतीने सत्कार करण्यात आला. संचालक एल. के. कुलकर्णी, अशोक गंजेवार, सीमाताई अतनुरकर, शैलजाताई मदनुरकर, प्रा. लीलाताई आंबटवाड, विजया देशमुख, कुणाल मालपाणी, संतोष कुलकर्णी, श्रीरंग हयातनगरकर, एस.एम. टाले, गोपालकृष्ण व्यवहारे, मामडे उपस्थित होते. ज्येष्ठ संचालक डॉ. श्रीकांत लव्हेकर यांनी आभार मानले.