सहकारी पतसंस्थांसाठी आगामी काळ संक्रमणाचा

स्रोत: सहकार सुगंध          तारीख:30-Oct-2019
 
 
पतसंस्थेकडे चांगल्या कर्जदाराकडून कर्जाची मागणी असेल तरच ठेवी वाढविण्याचा प्रयत्न करा. कारण चांगले कर्जदार पतसंस्था नंतर शोधेल किंवा पतसंस्थेकडे आपोआप येतील या आशेवर नवीन ठेवी स्वीकारल्या, तर त्या कमी व्याजदराने अन्य बँकांत गुंतवाव्या लागतील. यामध्ये पतसंस्थेस तोटा सहन करावा लागतो. यासाठी ठेवींच्या योजना काढण्यापेक्षा कर्जासाठी योजना सुरू करायला हव्यात. स्वीकारलेल्या ठेवीचा कर्ज वाटुन विनियोग करताना पतसंस्थेकडे आलेला कर्जदार भविष्यात अनुत्पादक होण्याच्या शक्यतेचा अभ्यास होण्याची आवश्यकता आहे.
 
सध्या अनेक मोठ्या नागरी सहकारी/छोट्याही पतसंस्था त्यांचे अनुत्पादक कर्जाचे (छ.झ.अ.) प्रमाण वाढल्याने अडचणीत आलेल्या आहेत. या पतसंस्थांचे गेल्या 8-10 वर्षांतील दरवर्षी ठेववाढीचे सरासरी अंदाजे प्रमाण 10% (किंवा थोडेफार कमीजास्त होऊ शकते. त्या भागातील भौगोलिक परीस्थितीवर अवलंबून) च्या दरम्यान आहे. सध्या बाजारात चांगले कर्जदार उपलब्ध नाहीत. त्यामुळे वाढलेल्या ठेवींचे काय करायचे, हा गहन प्रश्‍न आहे. पतसंस्था कर्ज वाटप करताना काही निकषांकडे दुर्लक्ष करतात व कर्ज वाटप करून मोकळ्या होतात.
 
आधीच विंडो ड्रेसिंग करून अनुत्पादक कर्जाचे प्रमाण पतसंस्थानी कमी दाखवलेले असते, त्यामध्ये या नवीन अनुत्पादक (छझअ) कर्जाची भर पड़ते. नवीन आणि पूर्वीची वसूल करताना दमछाक करणारी अनुत्पादक (छझअ) कर्जे, यामुळे पतसंस्थेतील सेवक मेटाकुटीला येतो-वैतागतो. त्याची मानसिकता नकारात्मक बनते व पाट्या टाकण्याचे काम, अचानक राजीनामा, अगर दुसर्‍या क्षेत्रात अगर दुसर्‍या संस्थेत नोकरी, असा पर्याय त्याच्याकडून शोधला जातो किंवा निवडला जातो. यामध्ये त्या पतसंस्थेचे न दिसून येणारे नुकसान होते. कारण पतसंस्थेने जुना अनुभवी व कुशल सेवक गमावलेला असतो. 
कायद्याचा आधार घेऊन किंवा सहकार कायदा 1960 मध्ये 97 व्या घटनादुरुस्तीनुसार कलम 156 नियम 107 मध्ये झालेल्या बदलाचा आधार घेऊन मालमत्ता ताब्यात घेऊनही घरांच्या अगर मालमत्तेच्या किमती घसरल्याने त्यांची विक्री होत नसल्याने, पतसंस्थाची अनुत्पादक (छझअ) कर्जाची वसुलीही मंदावली आहे किंवा काही प्रमाणात ठप्प् झाली आहे.
 
कर्ज मंजूर करताना मालमत्तेचे गृहीत धरण्यात आलेले पूर्वीचे मूल्यांकन आणि सध्या तेवढेच क्षेत्र असलेल्या नवीन मालमत्तेचे मूल्य याचा विचार केला असता, नवीन मालमत्ता स्वस्त किमतीत उपलब्ध आहेत. त्यामुळे पतसंस्थांनी ताबा घेऊन विक्रीस काढलेल्या मालमत्तांना (मिळकती) खरेदीदार मिळत नाही किंवा बाजारात तरलता नसल्याने जुनी मालमत्ता खरेदी विक्री बाजारपेठेत मंदी आहे किंवा नैराश्याचे वातावरण आहे.
अनुत्पादक (छझअ) कर्जाचे वाढत जाणारे प्रमाण, त्यामुळे घटणारे व्याजाचे उत्पन्न (अनुत्पादक कर्जावर व्याज आकारणी करता येत नाही), झालेल्या ढोबळ नफ्यातून अनुत्पादक कर्जापोटी करावी लागणारी तरतूद, स्वीकारलेल्या ठेवीवर द्यावे लागणारे व्याज, व्यवस्थापन खर्च, अनुत्पादक कर्ज वसुली होते म्हणून द्यावी लागणारी व्याजात अगर झालेल्या खर्चात सूट यांमुळे पतसंस्थांच्या नफ्यावर मोठा परिणाम झाला आहे.
 
काही पतसंस्थांनी थोड्याच कालावधीत आपल्या अनुत्पादक कर्जाची वसूली होईल, या आशेवर विंडो ड्रेसिंग करून पूर्वी अनुत्पादक कर्जे कमी दाखवली. खोटा नफा दाखवला. या खोट्या नफ्यातून लाभांश वाटला, सरकारला इन्कमटॅक्स भरला. कार्यालय नूतनीकरणावरही खर्च केला. त्या वेळी ऑडिटरला हाताशी धरून मागील आर्थिक वर्षात उत्पन्नात गृहीत धरण्यात आलेल्या व्याजात सूट देऊन अनुत्पादक कर्जे वसूल केली जात आहेत. म्हणजे न मिळालेल्या व्याजातुन टॅक्स व लाभांश दिला जातो व इतरही खर्च केला जातो.
 
काही दिवसांनी या पतसंस्थांचे ढोबळ अनुत्पादक कर्जाचे (छझअ) चे प्रमाण 15% ते 20% ते च्या वर जाते. पुरेसा ढोबळ नफा होत नसल्याने तुटपुंजी अगर आवश्यक तेवढीच तरतूद करावी लागल्याने नेट एनपीएचे प्रमाण 10% पेक्षा जास्त होते. प्रोव्हिजन कव्हरेज रेशोचे प्रमाण कसेतरी 60% चे दरम्यान होते. अशा वेळी जुना जाणता कुशल माहीतगार सेवकवर्ग हाताशी नसल्याने/पतसंस्था अडचणीत येतात. हे दुष्टचक्र निर्माण होण्याचे एकमेव कारण आपण स्पर्धेच्या माध्यमातून ठेवींवर जास्त व्याजदर देऊन वाढवलेल्या ठेवी व बेजबाबदारपणे केलेले कर्जवाटप हेच आहे.
चांगल्या कर्जदाराची जेवढी मागणी असेल व चांगले कर्जदार शोधण्याची तयारी असेल तरच ठेवी वाढवाव्यात. यासाठी मागील तीन वर्षांतील नवीन कर्जदारांकडून मागणी होऊन वाढलेल्या उत्पादक कर्जाची सरासरी वाढ विचारात घ्यावी. 
तुमची पतसंस्था मोठी का आमची पतसंस्था मोठी, कुणाच्या नफ्याचे प्रमाण चांगले, कोणाच्या लाभाशांचे प्रमाण जास्त, यापेक्षा थकबाकी, छझअ कमी कुणाचा याचा अभ्यास करा! सल्ला घ्या!! ठेवी+कर्जे हेच एकुण व्यवसायाचे सूत्र सांभाळा. व्यवसाय काढताना गुंतवणुकीची आकडेवारी विचारात घेतली जात नाही.
सहकार खात्यामधील कोणीही अधिकारी त्याच्या अधिकाराची मर्यादा ओलांडुन मदत करू शकत नाही याचे भान ठेवा. नागरी सहकारी पतसंस्था तपासणी विभागाकड़े, सहकाराबद्दल आपुलकी असणारा अधिकारी वर्ग आहे; पण आपण स्वच्छ असायला हवे. पतसंस्थेकडे चांगल्या व आपुलकीच्या नजरेने पाहणारा कर्मचारी व अधिकारी वर्ग सहकार खात्याकडे आहे; पण तुमचे चांगलेपण, हेतू त्यांच्या चाणाक्ष नजरेतुन सुटत नाही.
पुढील काळ नागरी पतसंस्थेकरिता संक्रमणाचा आहे. सरकार या चळवळीवर करडी नजर ठेवून आहे. म्हणून आपल्याला बदलायला हवे.. नियमाने व अभ्यासपूर्वक काम करायला हवे...
 
- गणेश निमकर
मो. 98225 68550