जोखीम व्यवस्थापन : बँकांची आवश्यक गरज

स्रोत: सहकार सुगंध          तारीख:30-Oct-2019

 
 
बँकांना जोखीम पत्करू देऊ नये. त्यांच्या दिवाळखोरीची किंमत समाजाला भरावी लागते. हे मत आहे जगप्रसिद्ध निबंधकार, जोखीम व्यवस्थापन शास्त्राचे अभ्यासक आणि ब्लॅक स्वान या पुस्तकाचे लेखक नसीम तलेब यांचे. बुडालेल्या बँका आणि त्यामुळे शासकीय अर्थकोषावर पडलेला भार यांचा अभ्यास केल्यावरच ते या निष्कर्षाप्रत पोहोचले असावेत!
 
आपण जर बुडालेल्या बँका अथवा इतर कंपन्यांचा अभ्यास केला तर त्या बुडण्यामागे एक समान सूत्र आढळून येते. ते सूत्र म्हणजे अतिमहत्त्वाकांक्षी भागधारकांच्या अवास्तव अपेक्षांची पूर्ती करण्यासाठी अथवा अनभिज्ञ गुंतवणूकदारांना अंधारात ठेवून आर्थिक फायदा लुटण्यासाठी वापरलेली असुरक्षित रणनीती. त्याच वेळी आपण आर्थिक मंदीत सुद्धा उत्तमपणे चालणार्‍या कंपन्यांचा अभ्यास केला तर त्यातील समान सूत्र असते उत्तम व्यवस्थापन! त्यामागे कंपनीच्या मुल्यांशी प्रतारणा न करता उद्दिष्टांशी बांधील राहून आखलेली व्यावसायिक रणनीती असते. रणनीतीचे यशस्वी कार्यान्वयन करण्याची योजना असते. त्याच बरोबर रणनीती कुठल्या कारणांनी अपयशी ठरू शकते याचा अभ्यास केलेला असतो. ती कारणे प्रत्यक्षात उतरली तर कंपनीला त्यांमुळे जास्तीत जास्त किती नुकसान होऊ शकते आणि ते नुकसान कमी करणे आपल्या आवाक्यात किती आहे या गोष्टींचा अभ्यास केला जातो. जास्तीत जास्त किती नुकसान सहन करण्याची क्षमता कंपनीकडे आहे त्याचा विचार केला जातो. त्यानंतर किती नफा मिळविण्यासाठी किती नुकसान सहन करण्याची तयारी आहे त्या मर्यादा ठरविल्या जातात. नुकसान सहन करण्याची आखून घेतलेली मर्यादा नुकसान सहन करण्याच्या क्षमतेपेक्षा थोडी कमीच असते. 
 
असे असूनसुद्धा गोंधळ होऊ शकतो. त्या गोंधळामागे असते मानसिकता. ही उद्भवते गाफीलपणातून, फाजील आत्मविश्‍वासातून, तसेच अतिसुरक्षेतून. आपण दिलेले व्यावसायिक कर्ज एनपीए होऊ नये म्हणून त्याच कर्जदाराला अधिक कर्ज देऊन आजचे नुकसान उद्यावर ढकलण्याची वृत्ती या प्रकारात मोडते. जिथे जोखीम व्यवस्थापन कार्यक्षम असते तिथे अश्या प्रवृत्तींना लगाम घातला जातो. हा लगाम घालण्यासाठी व्यावसायिक जोखीम व्यवस्थापन संरचना असते. ग्राहकांना सेवा पुरविणारे कर्मचारी या संरचनेची पहिल्या फळीतील सुरक्षा कर्मचारी असतात. हे आखून दिलेल्या नियमानुसार काम करतात. उदाहरणार्थ आपण गृह कर्ज प्रकरण घेऊ. कर्ज मंजुरीसाठी ग्राहकाचे उत्पन्न, घराचे मूल्य आणि त्यासाठीचे कर्ज यांचे गुणोत्तर, त्यासाठी पूर्तता कराव्या लागणार्‍या कायदेशीर बाबी इत्यादींसाठी आखून दिलेल्या नियमांचे पालन पहिल्या फळीतील कर्मचारी करतात. यांचे कार्यक्षेत्र भौगोलिक सीमांमध्ये मर्यादित असते. अश्या प्रत्येक भौगोलिक सीमांमध्ये दिल्याजाणार्‍या गृहकर्जाचा अभ्यास करणारी एक स्वतंत्र व्यवस्था असते. यांचे काम असते गृह कर्ज व्यवसायातील जोखमींचा अभ्यास करणे. या अभ्यासातून निघालेले निष्कर्ष तपासून, त्या संबंधित आकडेवारीचा अभ्यास करून, त्या अनुसार ते सांख्यिकी शास्त्राचा उपयोग करून कर्ज बुडण्याची शक्यता पडताळून पाहण्यासाठी समीकरणे तयार करतात. ग्राहकाचे उत्पन्न, व्यवसाय, वय, शिक्षण, क्रेडीट स्कोर आदी घटकांचा या समीकरणात समावेश असतो. त्या समीकरणानुसार मिळालेले गुण आणि बुडीत कर्जे यांचा अभ्यास करून ते कर्ज मंजुरीसाठी आवश्यक असलेली न्यूनतम गुणसंख्या निर्धारित करतात. या समीकरणांचा उपयोग पहिल्या फळीतील कर्मचारी करतात. पहिल्या फळीतील कर्मचार्‍यांनी सर्वत्र केवळ गृह कर्जांचीच प्रकरणे मंजूर केली, तर सर्वसाधारण परिस्थितीत बँक सुरक्षित दिसेल.परंतु गृह क्षेत्रात मंदी आली तर उद्भवू शकणार्‍या समस्यांना तोंड देण्याची तयारी जोखीम व्यवस्थापनच्या दुसर्‍या फळीला करावी लागते. मंदीतून उदभवणारी पहिली जोखीम म्हणजे इमारतीचे बांधकाम अर्धवट राहणे, लांबणीवर पडणे... इत्यादी. असे झाले तर गृहकर्जाच्या परत फेडीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्याच प्रमाणे व्याजाचे दर वाढले तर त्याचा अतिरिक्त बोजा ग्राहकांवर पडतो. तो सहन करण्याची क्षमता ग्राहकांमध्ये नसली तर त्याचा परतफेडीवर किती परिणाम होऊ शकतो आणि तसे घडले तर कर्ज एनपीए होण्याचे प्रमाण किती असू शकेल याचे आडाखे ही फळी बांधते. गृह कर्ज व्यवसायातून होऊ शकणार्‍या अश्या अपेक्षित आणि अनपेक्षित नुकसानीचा अभ्यास करून ही फळी बँकेच्या एकत्रित कर्ज खात्यामध्ये गृहकर्जाच्या वाट्याची कमाल मर्यादा ठरवते, जेणे करून बांधकाम व्यवसायात मंदी आली तर बँकेचे होऊ शकणारे नुकसान पूर्व निर्धारित मर्यादेच्या आत राहील. गृहकर्जाप्रमाणे इतर सर्व प्रकारच्या व्यवसायासाठी अश्या मर्यादा आखल्या जातात.
 
कर्ज व्यवसायात कर्ज थकणे, थकीत कर्जाची वसुली न होणे या प्रमुख जोखमी आहेत. पायाभूत सुविधांसाठी दिल्या जाणार्‍या दीर्घ मुदतीच्या कर्जासारखी क्लिष्ट कर्जे आणि कर्जाचे केंद्रीकरण या सुद्धा नुकसानीचा मोठा फटका देऊ शकणार्‍या जोखमी आहेत. केंद्रीकरण व्यक्ती, उद्योगसमूह, भौगोलिक, उद्योग, कर्ज योजना आदी कुठल्याही प्रकारे होऊ शकते. दुसर्‍या फळीतील जोखीम व्यवस्थापन या गोष्टींच्या सुद्धा मर्यादा ठरविते.
 
महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या मर्यादा अर्थव्यवस्थेच्या आरोग्यानुसार बदलत असतात. त्यांचाही सतत आढावा घेतला जातो.
दुसर्‍या फळीने पहिल्या फळीसाठी दिलेले दिशानिर्देश तयार करताना काही गृहीतके स्वीकारली असतात. या गृहितकांची स्वीकारार्हता तपासून पाहण्याचे काम संरक्षणाची तिसरी फळी करते. ही असते आंतरिक लेखा विभाग. पहिल्या फळीतील कर्मचारी जोखीम व्यवस्थापनाने दिलेले दिशा निर्देश व्यवस्थितपणे पाळतात की नाही ह्याची पडताळणी सुद्धा तिसर्‍या फळी तर्फे केली जाते.
 
जोखीम व्यवस्थापनाच्या तिन्ही फळ्या स्वतंत्रपणे काम करतात. यांचे नियंत्रण करण्याचे काम असते संचालक मंडळाचे. संचालक मंडळ जितके नितीवंत जितके ज्ञानवंत, जितके दृष्टीवन्त तितकी त्यांची कंपनी मजबूत! ही झाली सैद्धांतिक बाब. यात अडथळे कुठून उद्भवतात त्या संबंधी उहापोह पुढील लेखात.
 
श्री. राजीव खोंड
महाव्यवस्थापक
स्टेट बँक ऑफ इंडिया