सहकाराचा उगम आणि मुक्त अर्थव्यवस्थेतील स्थान

स्रोत: सहकार सुगंध          तारीख:30-Oct-2019
 
आपल्या भारत देशामध्ये सहकार चळवळीचा प्रारंभ 19 व्या शतकाच्या अखेरीस झाला. सन 1855 ते 1885 या कालावधीत जर्मनीमधील हर्मन शूूल्झ आणि इटालीतील लुईगी लुझाटी यांनी यशस्वीपणे सहकारी पतपुरवठा संस्था चालविल्यानंतर त्या वेळच्या बडोदा संस्थानात स्थायिक झालेल्या काही मध्यमवर्गीय महाराष्ट्रातील कुटुंबांनी श्री. विठ्ठल लक्ष्मण कवठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बडोदा येथे 5 फेब्रुवारी 1889 रोजीे ‘परस्पर साहाय्य संस्था’ सुरू केली. जेव्हा सहकारी पतसंस्थांचा कायदा 1904 साली प्रथम झाला, तेव्हा सहकारी संस्थांना कायदेशीर स्वरूप प्राप्त झाले आणि अशी या कायद्याखाली पहिली सहकारी पतसंस्था त्या वेळच्या अविभाजित मुंबई प्रांताच्या धारवाड जिल्ह्यात ‘बेटेगिरी सहकारी पतसंस्था’ व म्हैसूर संस्थानात ‘बेंगलोर सिटी सहकारी पतसंस्था’ अनुक्रमे सन 1904 व डिसेंबर 1905 मध्ये स्थापन झाली आणि आपल्या देशात सहकार चळवळीस खर्‍या अर्थाने प्रारंभ झाला.
 
भारत देशात मॅक्लेगन समिती सन 1915 मध्ये गठीत करण्यात आली होती, जिने या सहकारी चळवळीला प्रोत्साहन देण्याकरिता उपाययोजना सुचविल्या. त्या वेळेला देशातील जॉइंट स्टॉक बँका अपयशी ठरत होत्या आणि त्यामुळे सहकारी पतसंस्थांची गरज जाणूून सावकाराच्या विळख्यातून लोकांना सोडविण्याकरिता व त्यांना आर्थिक मदत करण्याकरिता तसेच जनतेला बचतीची सवय लागण्याकतरता सन 1919 ते 1938 या कालावधीत अनेक सहकारी पतसंस्था स्थापन झाल्या. 1930 च्या दशकात महामंदी आली होती, त्या काळातसुद्धा सहकारी पतसंस्थांवर कोणताही परिणाम झाला नाही. मात्र संस्था केवळ आपल्या समाजातील लोकांनाच सभासद करून त्यांना आर्थिक मदत करीत असत. त्यानंतर मात्र दुसर्‍या महायुद्धामुळे सन 1939 ते 1945 मध्ये आर्थिक भरभराट होऊन सहकारी पतसंस्थांची भरभराट मोठ्या प्रमाणात झाली आणि त्यांची संख्या वाढून त्यांनी आपली कार्यकक्षा विस्तारली. आत्तापर्यंत केवळ खावटी कर्ज देणार्‍या पतसंस्था या छोटे कारागीर, छोटे उद्योग-व्यवसाय करणार्‍या उद्योजकांच्या आर्थिक गरजा भागवू लागल्या.
 
सहकारी तत्त्वे आणि मूूल्ये :
 
आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशाची पंचवार्षिक योजना सुरू केली. त्यांच्या धोरणांमध्ये त्यांनी नमूद केले की, आपली मिश्र अर्थव्यवस्था ही खाजगी, सार्वजनिक आणि सहकारी क्षेत्राची बनलेली असून आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला केवळ सहकारच समतोलपणा, दिशा आणि मूल्ये देऊ शकतो आणि हे विधान त्यांनी पुढील प्रत्येक पंचवार्षिक योजनेमध्ये उद्घोषित केले. समाजवादी अर्थव्यवस्थेचा पाया पंडित नेहरूंनी स्वीकारला. 20व्या शतकाच्या सुरुवातीस भांडवलशाहीला पर्याय म्हणून समाजवाद आणि साम्यवाद हे उदयास आले. परंतु याच शतकाच्या शेवटी हे दोन वाद लयास जात असलेचे चित्र दिसून आले असून समाजवाद आणि साम्यवाद यांचे क्रांतिकारी तत्त्वज्ञान जणू नष्ट झाले आहे. भांडवलशाही आणि साम्यवाद यांच्यामधील दुवा म्हणजे सहकार आहे. कारण भांडवलाचे विकेंद्रीकरण, मुक्तता आणि लोकशाही ही मूल्ये सहकारात आहेत. सध्या साम्यवाद कोसळल्याने भांडवलशाहीस दुसरा पर्याय राहिलेला नाही. त्यामुळे समानता, न्याय आणि कल्याण यांकरिता ज्या समाजात दुर्बल घटक आहेत त्यांना सहकाराचीच कास धरल्याशिवाय गत्यंतर नाही. भांडवलशाहीमध्ये जास्तीतजास्त नफा काहीही करून स्वतःच्या स्वार्थासाठी मिळविण्याचा उद्देश बाळगला जातो. मात्र त्यातून सत्तेचा उद्रेक निर्माण होतो. गांधी तत्त्वज्ञानानुसार माणूस हा केवळ भौतिक गोष्टीतच सुख मानतो असे नाही; तर त्याग, शांती आणि मानवाचे कल्याण यांच्यात त्याला सुख प्राप्त होते. पण हे तत्त्वज्ञान केवळ आदर्शवादी ठरू शकते, प्रत्यक्षात ते दृश्य स्वरूपात आढळत नाही. त्यामुळे या गांधी तत्त्वज्ञानाचा अवलंब सहकारामध्ये दिसतो आणि म्हणून सहकारच मानवाचा उद्धार करेल, असे पंडित नेहरू यांना जाणवले.
 
आता मात्र आपल्या अर्थव्यवस्थेने समाजवाद सोडून नवीन खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाचा मार्ग धरला आहे, यालाच आपण मुक्त अर्थव्यवस्था म्हणतो.
 
मुक्त अर्थव्यवस्थेत सहकाराचे स्थान - आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सहकारी संस्थांची दि. 31/03/2018 रोजी खालीलप्रमाणे संख्यात्मक स्थिती होती.
 
 
 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका   35
 नागरी सहकारी बँका   507
 विविध कार्यकारी सहकारी संस्था   21062
 पतसंस्था   22336
 सहकारी गृहनिर्माण संस्था   139000
 सहकारी साखर कारखाने   191
 पणन सहकारी संस्था   1518
 जिनिंग प्रोसेस सहकारी संस्था   161
 इतर सहकारी संस्था   140997
 दूध डेअर्‍या   31005
 दूध संघ   92
 
 
मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये खाजगीकरणाला आणि खाजगी क्षेत्राला प्रथम प्राधान्य असून त्यामुळे सार्वजनिक क्षेत्र किंवा सरकारचे उपक्रम हे लयास जाणारे असून जागतिकीकरणामुळे परकीय भांडवल आणि उद्योग यांचा मुक्त शिरकाव झालेला आहे. त्यामुळे भविष्यात टिकून राहण्याकरिता आणि प्रगती करण्याकरिता सहकारपुढे मोठे आव्हान ठाकले आहे.
 
सर्वप्रथम आव्हान आहे ते म्हणजे स्पर्धात्मक युगाचे. पहिली स्पर्धा ही भारतातील खाजगी उद्योगाशी, तर दुसरी स्पर्धा ही परकीय भांडवलावर उभ्या केलेल्या परदेशी संस्थांची. आजपर्यंत नेहरू धोरणानुसार सहकाराला प्राधान्याची वागणूक मिळाली होती. उदा., आयकर कायद्यात सवलत, मुद्रांक शुल्क कायद्यामध्ये सवलत, भविष्य निर्वाह निधी कायद्यामध्ये सवलत, अशा अनेकविध कायद्यांमध्ये विविध प्रकारच्या सवलती शासनाने दिलेल्या होत्या. त्याचप्रमाणे शासनाचे अर्थसाहाय्यसुद्धा सहकारी संस्थांना प्राप्त होत होते. हे सर्व बंद झाले आहे. त्यामुळे साखर उद्योग असो, फळ प्रक्रिया संस्था असो, दुग्ध व्यवसाय असो, कुक्कुटपालन व्यवसाय असो आणि सहकारी बँकिंग व्यवसाय असो; यांच्यापुढे अस्तित्वाची गंभीर समस्या व प्रश्‍न उभे ठाकले आहेत. आत्तापर्यंत नफा कमावणे हा सहकारी संस्थांचा उद्देश नव्हता. मात्र, तो मिळवणे आणि विपुल प्रमाणात मिळवणे क्रमप्राप्त झाले आहे. त्याकरिता सहकारी संस्थांना सर्व स्तरांवर व्यवसायिक निर्णय घेणे अनिवार्य असून, मनुष्य संसाधन बळ हे पूर्णपणे व्यावसायिक व प्रशिक्षित असणे गरजेचे बनले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर जर सहकारी संस्थांनी वेळीच आत्मसात केला नाही तर त्यांचे अस्तित्वच नष्ट होईल. त्यामुळे संगणकीकरण करून ग्राहकसेवा ही ग्राहकाभिमुख ठेवली पाहिजे.
 
रिझर्व्ह बँकेचे तत्कालीन गर्व्हनर श्री. गांधी यांनी नागणून येथील सहकारी बँकांच्या परिषदेमध्ये आत्मचिंतनासाठी चार प्रश्‍न विचारले होते. त्यांवर आपण सहकारातील जाणत्या लोकांनी व तज्ज्ञांनी विचार करण्याची गरज आहे.
 
1. भारत देशामध्ये 130 वर्षांनंतरही सहकारी चळवळीची आता गरज उरलेली आहे काय? असल्यास ती का आहे आणि ती प्रत्यक्षात उतरविण्यासाठी काय केले पाहिजे?
2. आपल्या देशात परस्परांच्या लाभासाठी एक व्यक्ती एक मत, या संकल्पनेपलीकडे विचार करण्याची मानसिकता आहे काय?
3. सहकारी चळवळीने देशातील युवा पिढीच्या अपेक्षा जाणून घेतल्या आहेत काय?
4. सहकार चळवळ पुढे नेण्यासाठी गुणवान व उत्साही युवा पिढी तयार करण्यासाठी प्रयत्न झाले आहेत काय?
 
वरील सर्व बाबींचा परामर्श घेतल्यास सहकारी संस्थांचे मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये निश्‍चित स्थान आहे. मात्र ते कोणाला आहे? ज्या सहकारी संस्था पारदर्शक व्यवहार करतील, सहकाराचे सर्व कायदेकानू, नियम काटेकोरपणे पाळतील आणि सहकारांची तत्त्वे व मूल्ये यांचा अवलंब करून त्यानुसार तंतोतंत चालतील त्यांना निश्‍चितच उज्ज्वल भविष्य आहे. याकरिता जे लेखा परीक्षणातील उत्कृष्ट गुण मिळविर्‍याकरिता गुणवत्तेचे निकष लावले आहेत त्यापेक्षा सरस व 
 
स्वतःचा गुणात्मक दर्जा निर्माण करणे याशिवाय गत्यंतर नाही. हे करणे सोपे काम नाही, पण ते अवघडही नाही. त्याकरिता सहकारावर निस्सीम प्रेम करणारे आणि सहकाराशी प्रामाणिकपणे निष्ठा बाळगणारे कृतिशील आधुनिक नेतृत्व हवे.
 
 
- श्री. ना. रा. बोर्गीकर
(संवाद सहकाराचा वरून साभार)