सहकारी बँकांनी सामाजिक, आर्थिक परिवर्तनाचे काम करावे

स्रोत: सहकार सुगंध          तारीख:30-Oct-2019
 
 
 
शेगांव : नागरी सहकारी बँकांनी लहान उद्योजकांना त्याचप्रमाणे स्वयंसहायता महिला बचत गटांना अर्थसाहाय्य करून अशा घटकांच्या आर्थिक सक्षमीकरणास हातभार लावावा, अशी अपेक्षा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक सतीश मराठे यांनी व्यक्त केली आहे.
 
सहकार भारतीच्या वतीने राज्यातील नागरी सहकारी बँकांचे दोन दिवसीय अधिवेशन येथे आयोजित करण्यात आले होते. अधिवेशनाचे उद्घाटन श्री. मराठे यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. अधिवेशनास राज्याच्या विविध भागांतून सुमारे 1200 प्रतिनिधी उपस्थित होते.
 
सहकार भारतीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. मुकुंद तापकीर, सरचिटणीस विनय खटावकर, कराड अर्बन बँक अध्यक्ष सुभाष जोशी, बँक प्रकोष्ठ प्रमुख संजय बिर्ला, प्रदेश संघटनमंत्री नीळकंठ देवांगण, खामगाव अर्बन बँक अध्यक्ष व सहकार भारती विदर्भ प्रांताध्यक्ष आशिष चौबिसा, अपना नागरी सहकारी बँक अध्यक्ष दत्ताराम चाळके, आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
 
दैनिक तरुण भारतच्या वतीने राज्यस्तरीय महाअधिवेशनानिमित्त ‘सहकार’ ही विशेष पुरवणी प्रसिद्ध केली. त्याचे प्रकाशन उद्घाटन समारंभात करण्यात आले. या विशेष पुरवणीचे नागरी सहकारी बँकांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, अधिकारी यांनी स्वागत केले आहे.
 
श्री. मराठे यांनी उद्घाटनपर भाषणामध्ये नागरी सहकारी बँकांसमोरील प्रश्‍नांची मांडणी करताना त्यावरील उपाययोजना सांगितल्या. ते म्हणाले की, मोठ्या उद्योगपतींना अर्थसाहाय्य करण्याची बँकांची मानसिकता असते. पण त्यामध्ये काळानुरूप बदल करणे अपेक्षित आहे. लहान व्यावसायिक बँकांमध्येे जाण्यास ग्राहक फारसा तयार होत नाही. त्यामुळे नागरी सहकारी बँकांनी अशा लहान लहान उद्योजकांना अर्थपुरवठा करण्याची तयारी ठेवली पाहिजे. त्याचबरोबर कासा डिपॉझिटकडे लक्ष केंद्रित करायला हवे. जी व्यक्ती सेव्हिंग खात्यामधून विविध बिले अदा करते, अशा प्रकारची खाती सहकारी बँकांमध्ये उघडण्याचा प्रयत्न व्यापक स्तरावर झाला पाहिजे. त्याचप्रमाणे स्वयंसहायता महिला बचत गटांना अर्थसाहाय्य करण्याची भूमिका स्वीकारायला हवी. बचत गटांतील महिलांची बचतीची मानसिकता लक्षात घेता त्यांच्या बचत गटांची खाती सुरू करण्यास प्राधान्य दिले पाहिजे. यामुळे आपोआपच त्यांची ठेव बँकेमध्ये जमा होणार आहे.
 
आर्थिक साक्षरतेसाठी कोणतीही बँक विशेष प्रयत्न करीत नाही, अशी खंत व्यक्त करून ते म्हणाले की, नागरी सहकारी बँकांनी आर्थिक साक्षरतेबाबत वर्षामधून किमान एकदा खातेदारांचा प्रशिक्षण वर्ग, कार्यशाळा आयोजित केली पाहिजे. त्यासाठी रिझर्व्ह बँकेचे सहकार्य घेतले जावे. याचा नागरी बँकांना नक्कीच फायदा होऊ शकेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
 
सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाच्या उद्देशाने नागरी सहकारी बँकांची स्थापना झाली आहे. हे मूळ उद्दिष्ट यशस्वी होण्यासाठी नागरी सहकारी बँकांनी वाटचाल करावी. त्याचप्रमाणे बँकांनी दैनंदिन कामकाज पद्धतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान, कार्यक्षमता आणि अनुभव यांचा त्रिवेणी संगम साधावा, असे त्यांनी नमूद केले.
 
राज्यातील नागरी बँकांचे बोर्ड ऑफ मॅनेजमेंट, कर्मचारी भरतीचे अधिकार बँकांकडून काढून घेणे, शासकीय योजना सहकारी बँकांच्या माध्यमातून राबविण्यास उदासीनता दाखवली आहे. यासारख्या विविध प्रश्‍नांमुळे सहकारी बँकांची चळवळ संक्रमण अवस्थेमधून जात आहे. याबरोबर सहकारी बँकांचे खासगीकरण, बॅकिंग रेग्युलेशन अ‍ॅक्टमधे सुधारणा, सहकारी बॅकांना रिझर्व्ह बँकेचा रोडमॅप, सायबर सिक्युरिटी इन्फ्रास्ट्रक्चर उभे करण्यासाठी आर्थिक अनुदान, यांसाठी अधिवेशनाच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत, असा दिलासा त्यांनी दिला.
 
अधिवेशनाच्या सुरुवातीला श्री. किरण रेठेकर यांनी स्वागतगीत म्हटले. सहकार भारतीचे विदर्भ प्रांताध्यक्ष आशिष चौबिसा यांनी स्वागत करून अधिवेशनाच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. प्रदेश महामंत्री विनय खटावकर यांनी प्रास्ताविक केले. राष्ट्रीय बँक प्रकोष्ठ प्रमुख संजय बिर्ला यांनी मनोगत व्यक्त केले. राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य विवेक जुगादे यांनी उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. अधिवेशन सहप्रमुख अजय ब्रम्हेचा व अधिवेशन महाव्यवस्थापक दिनेश गायकी यांनी आभार मानले.