महिलांच्या आर्थिक सबलीकरणात बँकांची भूमिका
स्रोत: सहकार सुगंध         तारीख:14-Mar-2018
फार पूर्वी म्हणजे ४९-५० वर्षांपूर्वी महिलांच्या बुद्धिमत्तेविषयी फारशी चर्चा होत नसे. कारण ती सिद्ध व्हायला स्त्रियांना संधी नव्हती. घरापलीकडील जग तिला ज्ञात नव्हते. पण स्त्रिया जशा शिकल्या, आत्मनिर्भर झाल्या, तसा त्यांचा विकास होत गेला अबला सबला झाल्या आणि हा बदल वेगाने होत राहिला.
 
जगाचा वेग वाढला आणि आपल्या जीवनाची गणितेही बदलायला लागली. प्रत्येक गोष्टीचे निकष बदलले. सर्वसामान्यपणे प्रगतीचा मार्ग घरातूनच सुरू होतो आणि ज्या संस्कारांची शिदोरी पुढील आयुष्यात उपयोगी पडते, ते संस्कार आपल्या आईकडूनच आपणांवर घडत असतात. त्यामुळे सुशिक्षित व संस्कारी स्त्रिया या समाजरचनेच्या खर्या अर्थाने शिल्पकार असतात.
 
‘गरज ही शोधाची जननी आहे,’ असे म्हणतात. आपल्या अर्थव्यवस्थेत होत चाललेले क्रांतिकारक बदल, बँकांतून आलेली संगणकाची लाट, कामकाजाच्या आधुनिक पद्धती आणि निर्माण झालेले स्पर्धेचे युग, बँकिंगच्या क्षेत्रातील शासनाचे व रिझर्व्ह बँकेचे धोरण, मुक्त अर्थव्यवस्था या सार्यांचा परिणाम रोजच्या जीवनावर होत आहे.
 
अलीकडे शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार वेगाने होत आहे. तंत्रज्ञानाचा विकासही झपाट्याने होत आहे. समाजाची सामाजिक रचनाही होत असून कुटुंबं लहान होत आहेत आणि त्यामुळे कौटुंबिक जबाबदारी महिलांची वाढत आहे. त्यातून नवीन आचार-विचार, राहणीमान या सार्या गोष्टींचा विचार करता स्त्रियांनी स्वावलंबी होणे गरजेचे आहे. त्यांच्यामध्ये शैक्षणिक पात्रता असते, व्यवहार कुशलता असते, जबाबदारी पेलण्याची क्षमताही असते. पण कोणते क्षेत्र निवडावे, याची योग्य माहिती नसते. नोकरीपेक्षा स्वयंरोजगार जास्त फायदेशीर असतो.
 
केवळ व्यावसायिक व्हायचे ही इच्छा धरून व्यवसायात येणे आणि काही तरी उद्योग करणे हे आता फार काळ चालेल, असे नाही. आपल्याला जे करायचे आहे ते विचारपूर्वक, धडाडीने आणि नियोजनपूर्वक व कार्यकुशलतेने करायला हवे. उद्योगात यश मिळवायचे असेल, तर पहिल्यापासून आर्थिक शिस्त लावून घ्यायला हवी. प्रत्येक पैसा योग्य तेथे योग्य प्रकारे खर्च झाला तरच त्याचा योग्य परतावा मिळू शकेल. आपण नेमके कोणत्या टप्प्यावर आहोत हे जसे कळेल, तरच सुधारणेची आवश्यकता बघून वेळीच उपाय करता येईल. धंद्याला लागणारे कर्ज जर बँकेकडून घ्यावयाचे असेल तर बँक आपल्या आर्थिक व्यवहाराची कागदपत्रे प्रथम मागेल. त्यावरून कर्जाचा विचार करेल. त्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे म्हणजे शॉप अॅक्ट लायसेन्स, पार्टनरशिप डीड (नोंदणीकृत), जीएसटी रजिस्ट्रेशन, पर्चेस ऑर्डर्स, सेल्स बिले, स्टॉक रजिस्टर, धंद्याची येणी, धंद्याची देणी, नफा-तोटा पत्रक, ताळेबंद इ. तसेच तुमचे
 
स्वतःचे मर्जीने आणि तुम्हाला आवश्यकता असणारे लोन याचा सखोल विचार होईल.
 
सर्वसाधारणतः सर्वच बँका खेळत्या भांडवलासाठी (वर्किंग कॅपिटल) जे कर्ज देतात त्यासाठी दरमहा स्टॉक स्टेटमेंटची मागणी करतात. या स्टेटमेंटमध्ये महत्त्वाचे म्हणजे स्टॉक, ज्यामध्ये कच्चा माल, (शून्य प्रक्रियेअंतर्गत असलेला कच्चा माल) याचा समावेश असतो. कच्च्या मालाची खरेदी व पक्क्या मालाचे वितरण यासाठी नियोजन आवश्यक आहे.
 
नफा-तोटा पत्रक :-
 
पूर्ण आर्थिक वर्षात एप्रिल ते ३१मार्च या १२ महिन्यांच्या कालावधीत झालेला खर्च आणि मिळालेले उत्पन्न याची मांडणी करून झालेला निव्वळ नफा काढला जातो. कोणत्याही उद्योगाच्या दृष्टीने ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे.
 
वार्षिक आर्थिक ताळेबंद :-
 
सर्वसाधारणपणे ताळेबंद हा आर्थिक व्यवहाराचा आरसा असतो. वर्षभरात झालेल्या व्यवहाराची पूर्ण माहिती त्यात असते. व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल लागते, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे असते
 
स्वतःचा आत्मविश्वास, जिगर, पॉझिटिव्ह अॅप्रोच. व्यवसायात अगदी पूर्णपणे व्यावसायिक असावे लागते. भावना वगैरे आणली तर नुकसान होते.
 
जाहिरातीचा प्रभाव ग्राहकांच्या मनावर राज्य करत असतो. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी रोज नव्या योजना, सवलती यांचा भडीमारच सुरू असतो. वर्तमानपत्रे, हस्तपत्रिका, आकाशवाणी, दूरदर्शन ही तर झाली परंपरागत माध्यमे. सर्वच क्षेत्रांत संगणकाने शिरकाव केला तसाच झंझावाती प्रवेश संगणकाने जाहिरात क्षेत्रातही केला. स्मार्टफोन, आय पॉड्स, आय फोन्स आणि बरेच काही बाजारात आलेले आहे.
 
सोशल नेट वर्किंग वेबसाइट्स :-
 
हा शब्द आता अगदी घराघरांत वापरला जातो. उदा., फेसबुक, लिंक्डइन अशा संकेतस्थळांचा वापर व्यवसाय वाढीसाठी करता येतो. या माध्यमातून आपल्या व्यवसायाचा प्रसार करण्यासाठी किरकोळ स्वरूपाची गुंतवणूक करावी लागते. जेणेकरून खर्चापेक्षा होणारे फायदे मोठ्या प्रमाणात असू शकतात.
 
फेसबुकवर आपण आपल्या व्यवसायाचे स्वतंत्र पेज शेअर करू शकतो. आपण देऊ केलेल्या सवलती, नवीन उत्पादने, सेवा किंवा आपल्या व्यवसायाचा विस्तार नव्या ठिकाणी आपण केला तर त्याबद्दलची माहिती, उत्पादनाचे फोटोज हे आकर्षक पद्धतीने या संकेतस्थळावर टाकले तर आपले फोटोज हे आकर्षक पद्धतीने या संकेतस्थळावर टाकले तर आपली उत्पादने आपोआपच मोठ्या प्रमाणावर लोकांकडून बघितली जातील.
 
लिंक्डइन या संकेतस्थळावरून आपण औद्योगिक क्षेत्रातल्या नामवंत व विविध स्तरांवरील लोकांच्या गुपमध्ये शिरू शकतो. त्यामुळे औद्योगिक गरजा आणि व्यक्तिगत ग्राहक यांच्याशीही संपर्क होऊ शकतो. नवीन तंत्रज्ञान, व्यवसायातील बारकावे यांची अधिक माहिती मिळू शकेल. बर्याचदा आपल्या क्षेत्रात कार्यरत असणारे लोक एकत्र येऊन अनेक विषयांवर चर्चासत्रे भरवतात. व्यवसायातील अडचणींना एकत्रितपणे तोंड देण्यासाठीचे काही उपाय सापडू शकतात.
 
सचोटीने काम करणारा व्यावसायिक आहे, माझी उत्पादने चांगली आहेत. त्यामुळे ती आपोआपच विकली जातील, हे म्हणण्याचे दिवस आता संपले आहेत. नाणे वाजवून दाखविण्याचा काळ आहे; तरच आपला टिकाव लागणार आहे. थोडक्यात ग्राहक हा राजा आहे. त्याचा आदर करायलाच पाहिजे, ही वस्तुस्थिती आहे.
- सुनंदा करमरकर