विजय नागरी पतसंस्थेमुळे महिला बनल्या स्वयंसिद्धा
स्रोत: सहकार सुगंध         तारीख:14-Mar-2018
फायनान्स कंपन्या आणि खासगी सावकारांच्या जाळ्यात अडकल्यानंतर अवास्तव व्याजाचा राक्षस मानगुटीवर बसल्यानंतर त्यांचे दुष्परिणाम समाजात अनेक ठिकाणी दिसतात. मात्र, या जोखडातून महिलांना मुक्त करत त्यांना येथील विजय नागरी पतसंस्थेने नवा आर्थिक सक्षमतेचा मंत्र दिला. अडीच वर्षांच्या काळात अडीच हजारांवर महिला स्वतःचा उद्योग, व्यवसाय सांभाळत स्वयंसिद्धा बनल्या आहेत. संस्थेने महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी जवळपास साडेतेरा कोटींच्या आसपास कर्ज वितरण केले.
 
कर्जासाठी अनेक कागदपत्रांची जमवाजमव करताना सामान्य माणसाचा जीव मेटाकुटीला येतो. कागदपत्रे दिल्यांनतरदेखील पुरेसे कर्ज मिळेल की नाही, याची साशंकता असते. अशा स्थितीत कर्जदार कर्जाच्या रकमेची वेळेत परतफेड करेल की नाही, याचीदेखील शाश्वती नसते. त्यामुळे चांगल्या कर्जदाराची बँकांना प्रतीक्षा असते. मात्र, या नियमाला फाटा देत संगमनेरमधील विजय नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालकांनी नियमाबाहेर जात एक वेगळा संकल्प केला आणि त्यांनी विजय महिला सबलीकरण योजना पुढे आणली. आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या मोहजालासोबत शहरीकरणाच्या युगात बहुतांशी महिला खेड्यापाड्यांत, वाड्यावस्त्यांवर राहतात. त्यांच्यात व्यवसाय करण्याची इच्छा आहे. मात्र, योग्य मार्गदर्शन आणि आर्थिक पाठबळाचा अभाव आहे. अशा महिलांसाठी ही संस्था पुढे आली.
 
महिलांनी घरगुती समस्येसाठी कर्ज न घेता स्वतःचा व्यवसाय, उद्योगाच्या उभारणीसाठी आणि त्याद्वारे कुटुंबात आर्थिक स्थैर्य आणण्यासाठी कर्जाचा उपयोग करायचा, एवढीच एक अट त्यामागे टाकण्यात आली. जुलै 2014 मध्ये संचालक मंडळाने विजय महिला सबलीकरण योजनेचा पाया घातला आणि गेल्या अडीच वर्षांत या योजनेमार्फत तब्बल अडीच हजारांवर महिलांना साडेतेरा कोटींचे कर्ज वितरण करण्यात आले, तेदेखील कागदपत्रांच्या फारशा मोहजालात न अडकता. महिलांसाठी हाच एक प्लस पॉइंट ठरला आणि या संस्थेच्या माध्यमातून जोडल्या गेल्या अडीच हजारांवर स्वयंसिद्धा. या योजनेद्वारे अडीच हजारांवर कुटुंबांत आर्थिक साक्षरता आणि आर्थिक स्थैर्य निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. या माध्यमातून पतसंस्थेची ओळख तालुक्यापुरतीच मर्यादित न राहता ती आता जिल्ह्याच्या सीमारेषा ओलांडत आहे.
 
या विजय पतसंस्थेने महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासोबतच विविध सामाजिक उपक्रमांतदेखील योगदान दिले. रक्त तपासणी शिबिर, मकर संक्रांतीनिमित्त हळदीकुंकवाचा कार्यक्रम, वृक्षारोपण आदी उपक्रमांचे आयोजन करत महिलांची चांगल्या पद्धतीने बांधणी केली.
 
- पराग सराफ, अध्यक्ष
- सौ. मैथिली कुलकर्णी, संचालिका