महाशक्ती स्वयंसहायता गट / बचत गट
स्रोत: सहकार सुगंध         तारीख:14-Mar-2018
आजच्या काळात ‘लक्ष्मी देवो भव’ म्हणणारी संस्कृती होत चालली आहे व सर्व जण लक्ष्मीच्या मागे पळत आहेत, अशी ही लक्ष्मी म्हणजेसुद्धा स्त्रीच आहे आणि एकीकडे तिची पूजा आणि दुसरीकडे? पक्ष हे खर आहे. स्त्री म्हणजे मुलांना जन्म देणारी, घर पाहणारी आणि सेवाधर्म निभावणारी शांती, सुख पाहणारी, अशी सर्व गुणसंपन्न गृहिणी आहे. थोड्या शिक्षणाने सुद्धा तिच्या लक्षात आले की माझ्या कुटुंबाचे आर्थिक स्वास्थ्य टिकवायचे जायचे असेल तर मला बाहेर पडले पाहिजे. कारण काही मागितल्याशिवाय मिळत नाही. आम्ही मैत्रिणी एकत्र आलो तर काही करता येईल का? झाले. असा विचार एका महिलेच्या मनात आला आणि तिने दुसरीला सांगितला आणि १० जणी जमल्या-एकत्र आल्या. प्रत्येकीला काही तरी अडचण होती. तशीच आर्थिक अडचणही होती. प्रत्येकीने दर महिन्याला एक ठरावीक रक्कम जमा करावयाची आणि काही महिन्यांनी जिला गरज आहे तिला व्याजाने द्यावयाची व शेवटी येतील ते पैसे वाटून घ्यावयाचे. ही कल्पना अमलात आणली गेली व अशा रीतीने स्वयं सहायता गटाची स्थापना झाली.
 
महिलांनी एकत्र येऊन सामाजिक कामेसद्धा केली. त्यात गावात पाणी आणणे, किंवा रस्ते तयार करणे, दारूबंदी अशी एक ना अनेक कामे झाली. सरपंचाच्या खुर्चीवर बसून राजकारणही केले. घरगुती व्यवसाय सुरू केला. मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज घेऊ लागल्या. आपली मुले शिकली पाहिजेत हा विचार मनात रुजला. महिलांसाठी स्वयंसहायता गटासाठी जर स्वतंत्र व्यवस्थापन असेल तर समाजाची व सरकारची खूप कामे होऊ शकतील. खरे तर महिला आर्थिक विकास महामंडळाची स्थापना १९७५ मध्येच झाली आहे, पण त्याचे कार्य दृष्टिपथात येत नव्हते. महिलासुद्धा पुढे येऊन काही करत नव्हत्या स्वयंसहायता गटामुळे समाजातील बदल लक्षात घेऊन महिला व बाल विकास महामंडळाने महिला आर्थिक विकास महामंडळ हे महाराष्ट्र राज्यासाठी नुडल अगेन्सी म्हणून काम पाहिलं. असे परिपत्रक काढले. स्वयंसहाय गटाच्या माध्यमातून महिलाशी निगडित असलेल्या सर्व योजना राबविल्या जाव्यात. त्यामध्ये,
 
१) लिंगभेद नष्ट करणे म्हणजेच सर्वांना समान हक्क.
२) महिलांचा धीटपणा वाढविण्यास मदत.
३) महिलांना घरात, समाजात मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न.
४) महिलांची आर्थिक स्थिती उंचावली जाईल, असे पाहणे.
५) मानसिक व बौद्धिक प्रगती इत्यादी.
 
महाराष्ट्र राज्याने तेजस्विनी नावाची महिला बचत गटासाठी एक संकल्पना मांडली तेजस्विनी ही स्वसहायता ग्रामीण महिला आर्थिक विकास व (FAD) International Fund for Agriculture’ च्या सहाय्याने तळागाळात जाऊन काम करते. ही योजना ८ वर्षांसाठी आहे. महाराष्ट्राच्या ३३ जिल्ह्यांत हिचे काम चालते. १०४९५ स्वयंसाहायता गटाच्या मदतीने १० लाख महिलापर्यंत पोहोचवायचे आहे. आजपर्यंत तीन लाख त्रेसष्ट हजार महिलांपर्यंत ही योजना पोहोचली आहे.
 
निर्मल भारत स्वच्छता अभियानांतर्गत १२६११ महिला कार्यरत आहेत मायक्रो लेव्हल योजना ३०३६ असून त्याचे१४६५८ सभासद आहेत.
 
तेजस्विनीअंतर्गत
 
१) स्वंयसहायता गटांची कमिटी.
२) मायनॉरिटी महिलांसाठी स्वतंत्र योजना.
३) ४ टक्के दराने महिलांना बँकामधून कर्ज उपलब्ध करून देणे.
४) शेती व शेतीपूरक व्यवसाय उपलब्ध करून देणे.
५) महिला आर्थिक विकास महामंडळाने गावपातळीवर स्वयंसहायता गटाची स्थापना करणे.
६) त्यांना आर्थिक विकास व कौशल विकास याची माहिती देऊन त्या त्यांच्या पायावर कशा उभ्या राहतील हे पाहणे.
७) कौशल विकास ही संकल्पना मेक इन इंडिया संकल्पनेपासून आली. म्हणजे सन २०१४ पासून ती विकसित झाली.
 
त्याच्या अंतर्गत येणारे कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्याचे काम सुरू झाले. त्यामध्ये मुख्यत्वेकरून
 
१) शिवणकाम व कलाकुसर,
२) वेगवेगळे धातू किंवा मणी, मोती यांच्या सहाय्याने दागिने बनविणे,
३) सर्व प्रकारचे मसाले,
४) हळद, तिखट पावडर
५) फुलांची शेती
६) गांडूळखत, औषधी वनस्पतींची लागवड
७) मधमाशी पालन गाई-म्हशी पालन, शेळी-मेंढी पालन, कुक्कुटपालन
८) मोबाइल दुरुस्ती,
९) ब्युटी पार्लर
१०) मत्स्यपालन
११) गांडूळ शेती इत्यादी अशा अनेक व्यवसायांचे मार्गदर्शन होत असून बँकांमधून कर्जे दिली जात आहेत व हे काम अत्यंत जलद गतीने होत आहे.
 
आशा देशपांडे