कर्तृत्वाची उत्तुंग भरारी
स्रोत: सहकार सुगंध         तारीख:14-Mar-2018
संसाराबरोबरच आपल्यातील कलागुणांची आवड जपण्यासाठी काही महिला सातत्याने धडपड करत असतात आणि त्यात यशस्वीही होतात. अशा महिलांमध्ये सौ. माधुरी विलास हावरे यांचे नाव प्रेरणादायी व आदर्शवत आहे. गुणवत्तापूर्ण मालाची निर्मिती करून ग्राहकांना अनोखी भेटच त्यांनी दिली आहे. माधुरीताई गेल्या 32 वर्षांपासून स्वेटर्स व शालींचा व्यवसाय करत आहेत. त्यात त्यांनी स्वतंत्र ब्रँडही निर्माण केला आहे. चित्रकला व रांगोळी काढणे हा त्यांचा आवडता छंद आहे. त्यांची प्रदर्शनेही झाली होती. बी.ए. पदवीनंतर चित्रकला, एम्ब्रॉयडरीचे क्लास त्यांनी घेतले. विवाहानंतर नोकरी न करण्याचे त्यांनी ठरवले होते. पण आनंदासाठी, मन रिझवण्यासाठी काहीतरी व्यवसाय करण्याचे त्यांच्या मनात होते आणि त्यातून पतीच्या पाठिंब्याने स्वेटर्स विणकाम व विक्री करण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यामुळेच त्यांना नवे अवकाश प्राप्त झाले. त्यांच्या प्रोत्साहनामुळेच व्यवसायात आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. स्वेटर तयार करण्याचे एक छोटे मशीन त्यांनी खरेदी केले. लोकर आणणे, गुंडाळणे, ऑर्डरप्रमाणे त्या स्वेटर बनवून देत. आकर्षक रंगसंगती, डिझाइन यांमुळे स्वेटरला मागणी वाढली. त्यामुळे ताईंना आत्मविश्वास आला.
 
फॅन्सी स्वेटर्समध्ये कार्डिगन, पोलोनिक, बेबी गारमेंट्स, विन्डचिअर असे अनेक प्रकार आहेत. लेडीज स्वेटर्समध्ये भरपूर वैविध्ये उपलब्ध असते. त्यामानाने जेन्ट्सच्या स्वेटर्सना मर्यादा असतात. हल्ली विविध कार्यक्रमांसाठी वेगवेगळी स्वेटर्स वापरली जातात. उदा. पार्टीवेअर स्वेटर्स, 3 ते 4 प्रकारच्या शाली. सध्या 2 महिला त्यांचेकडे नोकरी करतात. पूर्वी त्यांनी विविध प्रकारच्या प्रदर्शनांमध्येही भाग घेतला आहे. रचना विद्यालयाला दोन वर्षे स्वेटर्स पुरवली आहेत. आजच्या कॉर्पोरेट जगात व्यवसायाच्या खूप संधी उपलब्ध आहेत. त्यासाठी मेहनतीची तयारी ठेवल्यास आर्थिक प्राप्तीही चांगली होते व आनंदही मिळतो. आर्थिक सबलीकरणासाठी हे खर्या अर्थाने पाऊल आहे. नवी भरारी घेत आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य महिलांमध्ये आहे. ते त्यांनी सिद्ध करायला हवे.
 
शब्दांकन : राजू देसले