जनकल्याणची पुणे शहरातील वाटचाल...

स्रोत: सहकार सुगंध          तारीख:14-Mar-2018
सोलापूरच्या जनकल्याण समिती बचत गटाचे कार्य 1998 पासून सुरू झाले. सोलापूर शहर व परिसरातील गरीब, गरजू, निरक्षर महिलांची बँकेमध्ये खाती उघडून घेऊन बचतीची सवय लावणे व त्यातून गरजेनुसार छोटी कर्जे घेऊन बचत गट चालवणे सुरू झाले. याच पार्श्वभूमीवर पुण्यात सिंहगड रोड येथे 2016 पासून एक शाखा कार्यान्वित झाली.
 
 
 
या दोन वर्षांत शाखेचा व्यवसाय 1 कोटी 25 लाखांपर्यंत पोहोचला आहे व तो दिवसांगणिक वाढतच आहे. शाखेची सभासद संख्या एकूण 350 इतकी आहे. शाखेने आजपर्यंत 40-50 बचत गटांना कर्ज दिले आहे व त्यामधील महिला सक्षम होण्यास मदत होत आहे. एकूण बचत खाती 1250 झाली आहेत.
 
सिंहगड रोड शाखेनंतर 2017 मध्ये शेवाळेवाडी येथे एक शाखा कार्यरत झाली व त्या शाखेनेदेखील अंदाजे 75 लाखांपर्यंत व्यवसाय केला आहे. या शाखेची सभासद संख्या 200 इतकी आहे. दोन्ही शाखा व्यवस्थित सुरू झाल्याने आत्मविश्वास वाढला. त्यामुळेच किवळे (विकासनगर) देहूरोड येथे तिसरी शाखा जून 2017 मध्ये सुरू झाली. या शाखेचा व्यवसाय 40 लाखांपर्यंत झालेला आहे. या शाखेत सभासद संख्या 20 इतकी असून बचत खाती 250 आहेत.
 
ठेवींवर व्याजदेखील जास्त असल्याने ज्येष्ठ नागरिकांचा ओघ जास्तच आहे. नुकताच सिंहगड रोड शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांचा मेळावा घेऊन सत्कार करण्यात आला. सस्मित सेवा हेच आमच्या व्यवसायवृद्धीचे एक मुख्य कारण आहे. मागील वर्षी महिला दिनाच्या कार्यक्रमादिवशी प्रमुख पाहुण्या महापौर मुक्ता टिळक आल्या होत्या. त्यांनीदेखील संस्थेच्या कामाविषयी गौरवोद्गार काढले. आता ग्राहकोपयोगी सेवा देण्याचा विचार करत आहोत. मकर संक्रांतीच्या हळदी-कुंकू कार्यक्रमाच्यावेळी किवळे शाखेत चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यास बाळ-गोपाळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
 
संस्थेकडून कर्ज घेऊन महिलांनी छोटे-छोटे व्यवसाय सुरू केले. खानावळ, पिठाची गिरणी, टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू तयार करणे, पत्रावळी व द्रोण बनविण्याचे मशीन घेणे, दिवाळी फराळ व्यवसाय इ. अनेक व्यवसाय सुरू झाले. म्हणूनच आमचे ब्रीदवाक्य ‘विकासाच्या परंपरेला आपणा सर्वांची साथ आहे. वंचितांच्या प्रगतीला ‘जनकल्याण’चा हात आहे...’ असे आहे.