सामाजिक संस्थांच्या पाठीशी आर्थिक पाठबळ उभे करा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

स्रोत: सहकार सुगंध          तारीख:14-Mar-2018

 
 
डोंबिवली : “अनेक संस्था समाजासाठी चांगले काम करत आहेत. या संस्थांना आर्थिक पाठबळाची आवश्यकता आहे. प्रत्येकाने क्षमतेप्रमाणे आपल्या उत्पन्नातील वाटा या सामाजिक संस्थांना अर्पण केला पाहिजे,’’ असे आग्रही प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी येथे स्पष्ट केले.
 
डोंबिवली बँकेने योजलेल्या अनुदान वितरण व पुरस्कार सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. सरकार राजाश्रय देईल, परंतु आर्थिक मदत करायला मर्यादा आहेत. आज पैसे उपलब्ध करू शकणार्या उद्योगांचीही वानवा नाही, उद्योजकांना योग्य संस्थांपर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता आहे. ते काम डोंबिवली बँकेने करावं, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अरविंदरावांसारख्या ऋषितुल्य व्यक्तीला पुरस्कार देण्याचं भाग्य मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. त्याचप्रमाणे आपल्या भाषणात त्यांनी डोंबिवली बँकेच्या सातत्यपूर्ण प्रगतीबद्दल बँकेचे अभिनंदन केले.
 
या वर्षीचा सहकार मित्र पुरस्कार जनता सहकारी बँक, पुणेचे माजी अध्यक्ष अरविंदराव खळदकर यांना प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप ५१,००० /- रोख, मानपत्र व बँकेचे सन्मानचिन्ह,असे होते.
 
“मी हा पुरस्कार बँकेचे निष्ठावान सेवक, संयमी सभासद व खातेदार तसेच धाडसी संचालक मंडळ यांना अर्पण करतो आहे. स्वभावाच्या विरुद्ध परंतु प्रामाणिकपणे काम करत राहिले, तर नियतीही तुम्हाला साथ देते असेही प्रत्ययाला आले. केवळ त्यामुळेच जनता बँकेला गतवैभव प्राप्त झाले आहे,’’ असे श्री. खळदकर म्हणाले.
 
समाजमित्र पुरस्कार वयम् या जव्हार, मोखाडा भागात- आदिवासी भागात- नेतृत्व विकास व लोकशाहीबद्दल समाजाभिमुख जनजागृतीचे कार्य करणार्या सामाजिक संस्थेला प्रदान करण्यात आला. १,००,००० /- रोख, मानपत्र व बँकेचे सन्मानचिन्ह, असे पुरस्काराचे स्वरूप होते.
 
वयम् संस्थेचे कार्यवाह व ग्रामपंचायत विकास आराखड्यात शासनमान्य प्रशिक्षक श्री. प्रकाश बरफ, वयम्च्या पूर्णवेळ कार्यकर्त्या प्रेमाताई खिरारी व युवा विस्तारक श्री. भास्कर चिभडे हे कार्यकर्ते उपस्थित होते.
 
आजचे पुरस्कार ऋषितुल्य योद्धा व्यक्तींंना प्रदान करताना अत्यंत समाधान वाटते आहे, अशी भावना बँकेचे अध्यक्ष उदय कर्वे यांनी प्रास्तविकात व्यक्त केली. सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, क्रीडा क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्या ११७ संस्थांना २५ /- लाखांचे अनुदान वितरण करण्यात आले. मानपत्रांचे वाचन संचालिका, पूर्वा पेंढरकर व संचालक श्री. मिलिंद आरोलकर यांनी केले. सहकार गीत कृतिका केतकर यांनी म्हटले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नम्रता सावंत यांनी केले.