केंद्रीय अर्थसंकल्पावर सहकार भारती पुणे महानगरतर्फे चर्चासत्र संपन्न

स्रोत: सहकार सुगंध          तारीख:14-Mar-2018

 
 
पुणे : नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये सहकार क्षेत्राच्या दृष्टीने कोणतीही ठोस तरतूद नसल्याचे सीए सुधीर पैठणकर यांनी सांगितले. सहकार भारती पुणे महानगरतर्फे स्थापना दिनानिमित्त ‘केंद्रीय अर्थसंकल्प आणि सहकारी संस्था’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते, त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधिज्ञ दादासाहेब बेंद्रे होते. पुणे महानगर अध्यक्ष सुनील रुकारी, संघटन सचिव दीपक अहिर, सहकार सुगंधचे संपादक व सहकार भारतीचे राष्ट्रीय प्रचारप्रमुख भालचंद्र कुलकर्णी होते.
 
अर्थसंकल्पात सहकार क्षेत्रासाठी काही नाही, हे जरी खरे असले तरी पण या क्षेत्रातील अनेक संस्थांना काही बदल स्वीकारावे लागणार आहेत; जे अन्य संस्थांना लागू झाले आहेत. सहकारी संस्था या त्यांच्या सदस्यांबरोबर व्यवहार करीत असल्या, तरी संस्था संस्थांमध्ये दुजाभाव पाहावयास मिळतो. नाममात्र सदस्य आणि पूर्ण सभासद यात फरक केला जातो. कंपनी कायद्यातही हीच प्रणाली अमलात आणली जात आहे, पण आता ऑनलाइनवर अधिक भर दिला जात असल्याने गैरव्यवहारास आळा बसण्यास मदत झाली आहे.
 
देशामध्ये जीएसटीची अंमलबजावणी झाल्यानंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे, असे नमूद करून ते म्हणाले की, जीएसटीमुळे महसुलात वाढ होणे शक्य आहे, असा अंदाज आहे. मात्र कोणताही राजकीय फायदा समोर ठेवून अर्थसंकल्पाची मांडणी करण्यात आली नाही. अर्थसंकल्पात काही गोष्टी चांगल्या असल्या, तरी काही बाबींबाबत अपेक्षाभंग झाला आहे, असे ते म्हणाले.
 
श्री. बेंद्रे म्हणाले, “सहकाराच्या क्षेत्राचे चित्र पूर्णपणे निराशाजनक आहे, असे नाही. काही संस्था चांगले काम करीत आहेत. या कामांची अधिकाधिक प्रमाणात व्याप्ती वाढावी यासाठी सहकार भारतीच्या कार्यकर्त्यांनी अधिक जोमाने काम करावे.’’
 
दीपप्रज्वलन झाल्यावर श्री. चंद्रमोहन शिखरे यांनी सहकार गीत गायिले. महानगर उपाध्यक्ष माणिकलाल मालपाणी यांनी स्वागत केले. श्री. कुलकर्णी यांनी प्रास्ताविकामध्ये सहकार भारतीच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा घेतला. सहकार भारतीचे संस्थापक प्रणेते लक्ष्मणराव इनामदार यांच्या जीवनावर आधारित चित्रफीत दाखवण्यात आली. सहकार भारती जिल्हा संघटनप्रमुख अनिल देशपांडे यांनी आभार मानले आणि सहकार मंत्र म्हटला. केतकी कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.